P. N. Patil : आमदार पी. एन. पाटलांच्या निधनाने घरातील लाडक्या 'ब्रुनो'ने देखील जीव सोडला; मनाला चटका लावणारी 'एक्झिट'
पी. एन. पाटील यांच्या घरी गेल्या 9 वर्षांपासून ब्रुनो घरचा सोबतीच होता. मात्र, पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं. ब्रुनोने 28 मे रोजी अखेरचा श्वास घेतला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाले. 19 मे रोजी राहत्य घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्याच मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह जिल्हा काँग्रेसला धक्का बसला असतानाच आता त्यांच्या लाडक्या श्वानाने देखील आपला जीव सोडला आहे. पी. एन. पाटील यांच्या घरी गेल्या 9 वर्षांपासून ब्रुनो घरचा सोबतीच होता. मात्र, पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं. ब्रुनोने सुद्धा काल (28 मे) रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मुक्या प्राण्यांमधील भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
काँग्रेस पक्ष निष्ठावंत नेत्याला मुकला : राहुल गांधी
दरम्यान, पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील नेत्यांपासून ते कार्यकर्त्यापर्यंत घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केलं आहे. राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्यक्ष भेटून पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले. काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी पत्र पाठवून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केलं आहे. पाटील यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष निष्ठावंत नेत्याला मुकल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
आमदार पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. आमदार पाटील यांनी त्यांचे आयुष्य सामान्य माणसासाठी वाहून घेतले होते. त्यांनी काँग्रेसचे विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे केल्यानेच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली. अशा नेतृत्वाला आम्ही मुकलो असून गांधी परिवार अखंडपणे पाटील परिवारासोबत कायम राहील. असे राहुल गांधी यांनी राहुल पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आमदार पाटील हे अखंडित 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी जयंती निमित्त सौदभावना दौड काढत होते. त्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या