(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना बुडालेल्या कोल्हापूरच्या जवानाचाही मृत्यू, मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने करूण अंत
Kolhapur : बीड जिल्ह्यात माजलगाव धरणात पोहण्यास गेल्यानंतर बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान राजशेखर मोरे यांचाही करुण अंत झाला.
Kolhapur : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये पोहण्यास गेल्यानंतर बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान राजशेखर मोरे यांचाही करुण अंत झाला. माजलगाव धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टर दत्ता फपाळ यांचा काल सकाळी बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरहून एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली होती. या पथकामध्य जवान राजशेखर मोरे यांचा समावेश होता. धरणामध्ये शोध मोहीम सुरु असताना विजय मोरे ऑक्सिजन सिलिंडरसह पाण्यात उतरले होते.
बेपत्ता झाल्यानंतर युद्धपातळीवर बचावासाठी प्रयत्न
कोल्हापूरच्या केडीआरएफ टीममधील शुभम काटकर व राजशेखर मोरे या दोघांनी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पाण्यामध्ये उडी घेतली, मात्र 15 मिनिंटांनी या दोघांपैकी एक कर्मचारी असलेल्या शुभम काटकर यांना बीडच्या पथकाने पाण्यातून बाहेर काढलं. त्यांच्यावर माजलगाव शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोरे शोधकार्य घेत असतानाच बेपत्ता झाल्यानंतर बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते. मात्र प्रयत्न फोल ठरले. पाण्याखाली बेपत्ता झालेल्या जवानाला स्थानिक मच्छिमार महिलांनी गळ लावून वर काढले. धरणकाठी जवानाची तपासणी करून बचाव पथकातील डॉक्टरांनी या जवानास मयत घोषित केले.
मच्छिमारांच्या जाळ्याने घात केला
डॉक्टरचा शोध घेण्यास राजशेखर मोरे यांनी उडी घेतल्यानंतर बराच वेळ ते वर आले नाहीत. त्यामुळे शोध मोहीम सुरु करण्यात आली. सिलिंडर वर आल्यानंतर त्यांचा तीन तास शोध सुरु होता. अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह मिळाला. मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकल्याने त्यांचा करुण अंत झाला.
काल डॉक्टरचा बुडून मृत्यू
माजलगावच्या दिंद्रुडमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रसिद्ध असलेले डॉक्टर दत्ता फफाळ हे त्यांच्या मित्रासोबत काल माजलगाव धरणामध्ये पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने डॉक्टर फपाळ यांना शोधण्यासाठी सुरुवातीला परळी बीड आणि माजलगावच्या शोध पथकाने काल दिवसभर मोठी मेहनत घेतली. मात्र, डॉक्टरांचा शोध न लागल्याने बीड जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर येथील केडीआरएफच्या टीमला बोलावले होते.
बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा स्वतः पाण्यात उतरले
बुडालेल्या राजशेखर यांच्या बचावासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. यासाठी स्थानिक मच्छीमार बांधवांनी सुद्धा मोठी मेहनत घेतली. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापनच्या बोटमध्ये बसून माजलगाव धरणामध्ये गेले. मात्र, यात दुर्दैवाने राजशेखर मोरे यांना जवानाला जिवंत बाहेर काढण्यात अपयश आले.
इतर महत्वाच्या बातम्या