(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : प्रियकराचा खून केला खोपोलीत, अन् मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आली कोल्हापुरात; प्रेयसी 'अशी' सापडली जाळ्यात!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजेंद्र व सुनीताचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गजेंद्रने सुनिताला लग्नाचे आमिष दाखवले होते. सुनीताकडून सातत्याने पैसेही उसने घेतले होते.
कोल्हापूर : प्रेमसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने आणि वारंवार पैसे उकळल्यानंतर ते परत न दिल्याने प्रेयसीने प्रियकराचा गळा आवळून खून केल्याचा घटनेचा उलघडा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुमेवाडी (ता. आजरा) गावाजवळ मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आलेली प्रेयसी सुनीता सुभाष देवकाई (वय 44 रा. खोपोली, ता. खालापूर जि. रायगड) हिच्यासह अमित पोटे (वय 28 रा. सुळे, ता. आजरा) व सुरज देवकाई (वय 24 रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड) या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अमित पोटे हा घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पुण्यातून त्याला अटक करण्यात आली. 27 मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कपणामुळे हा खुनाचा प्रकार समोर आला होता.
झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून खून
गजेंद्र सुभाष पांडे (वय 38, रा. जिंतूर, जि. परभणी) असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजेंद्र व सुनीताचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गजेंद्रने सुनिताला लग्नाचे आमिष दाखवले होते. सुनीताकडून सातत्याने पैसेही उसने घेतले होते. मात्र, लग्न करत नसल्याने आणि उसने पैसे देत नसल्याने बुधवारी 27 मार्च रोजी खोपोलीत गजेंद्रला झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून खून करण्यात आला. सुनीता व अमित पोटे यांनी खोपोलीमध्ये गजेंद्रचा गळा आवळून खून केला.
ट्रॅव्हल्स बॅगेत मृतदेह भरून कोल्हापुरात आणला, पण पोलिसांमुळे...
खून केल्यानंतर ट्रॅव्हल बॅगेत गजेंद्रचा मृतदेह भरून कारने कोल्हापुरात कागलमध्ये आले. याठिकाणी पेट्रोल खरेदी केल्यानतंर आजऱ्याकडे जाताना शेतातून हरभऱ्याचा कोंडा घेतला. मुमेवाडीनजीक कार थांबवून गाडीतील मृतदेहाची बॅग, कोंडा व पेट्रोलच्या बाटल्या डोंगरातील झुडपात ठेवल्या. यावेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांना रस्त्यावर कार उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना झुडपाजवळ एक महिला, मृतदेहासह असलेली ट्रॅव्हल बॅग आणि पेट्रोलने भरलेल्या चार बाटल्या आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कपणामुळे खुनाचा प्रकार उघडकीस आला.
इतर महत्वाच्या बातम्या