Kolhapur Crime : रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, जखमी क्रिकेटप्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur Crime : मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे आणि सागर सदाशिव झांजगे यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एका आयपीएल सामन्याने एकाचा हकनाक बळी गेला आहे. ,
कोल्हापूर : आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळाडू आणि संघाचे मालक पोत्याने पैसा कमवत असतानाच कोल्हापुरात शुल्लक कारणातून एकाचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा (Rohit Sharma) आऊट गेल्यानंतर आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा केल्याचा राग आल्यानंतर डोकं फोडलेल्या क्रिकेटप्रेमीचा (CSK fan Kolhapur) मृत्यू झाला आहे. बंडोपंत बापूसो तिबिले (वय 63, रा. हणमंतवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोकं फुटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मारहाण करणाऱ्या बळवंत महादेव झांजगे (वय 50) आणि सागर सदाशिव झांजगे (वय 35, दोघे रा. हणमंतवाडी) यांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एका आयपीएल सामन्याने एकाचा हकनाक बळी गेला आहे.
रोहित बाद झाल्यानंतर आनंद व्यक्त केल्याने राग अनावर
तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स (MI fan Kolhapur) विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामना झाला. या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या चाहते असलेल्या बंडोपंत तिबिले यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी रागात बळवंत आणि सागर यांनी जीवघेणा हल्ला केला. 27 मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत बंडोपंत बापूसो तिबिले गंभीर जखमी झाले.
नेमका प्रसंग काय घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांससह गल्लीमध्ये एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सचे चाहते होते. हैदराबादने धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांना चांगलाच राग आला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले त्याठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हणत आनंद व्यक्त केला. यावेळी रागावलेल्या बळवंत आणि सागर यांनी डोक्यात हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलिसही चक्रावून गेले.
इतर महत्वाच्या बातम्या