Kolhapur Crime: कामधंदा करत नसल्याने कर्जबाजारी अन् मग कर्ज फेडण्यासाठी, चैनीसाठी दुचाकी चोरल्या; 9 गुन्हे उघडकीस
Kolhapur Crime: चोरटा नीलेश कामधंदा करीत नसल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. यातून त्याला चैनीची सुद्धा सवय लागली.

Kolhapur Crime: काहीच कामधंदा करत नसल्यामुळे तो कर्जबाजारी झाला, त्यानंतर घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी तो दुचाकींच्या चोऱ्या करु लागला. त्यानंतर त्याच चोऱ्यांमधून चैन करण्याची सवय लागली आणि आता पोलिसांच्या गळाला लागल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. नीलेश बाबासो सावंत (वय 36, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून शहरातील चोरीस गेलेल्या सुमारे पाच लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 10 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
असा सापडला जाळ्यात
कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना नीलेश सावंत जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली दुचाकी तपोवन मैदान नजीकच्या शाळेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. यावेळी त्याच्याकडे चोरीस गेलेली दुचाकी मिळून आली. अधिक चौकशी करताच आणखी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. नीलेशने गेल्या दोन ते अडीच महिन्यांमध्ये शहरात विविध ठिकाणी डुप्लीकेट चाव्यांचा वापर करून आणखी 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या 9 आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कामधंदा करत नसल्याने चोरीचा नाद लागला
नीलेश कामधंदा करीत नसल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. यातून त्याला चैनीची सुद्धा सवय लागली. त्याच्याकडून जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 5, शाहुपुरी पोलिस ठाण्यातील 3 व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील 1 असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे अन् काम विदेशी दारु चोरून विकणे
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड फरारी आरोपी गोडावून आणि मद्यसाठ्याचा मालक अनिरूध्द अरूण राऊतला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली होती. मुख्य आरोपी अनिरुद्ध हा उच्चशिक्षित इंजिनिअर असून त्याने बीई मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. प्राथमिक चौकशीत कोल्हापूर शहरातील उच्चवर्गीय प्रतिष्ठित यांचे ग्राहक असल्याचा संशय आहे. त्याला त्याच्या पंटरसह ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























