Kolhapur Crime : कोल्हापुरात नव्या वर्षात लाचखोरांची मालिका सुरु; एजंटमार्फत लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात
कोल्हापुरात लाचखोरांची मालिका नव्या वर्षात सुरु झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील शिरोची पुलाचीमध्ये ग्रामसेवकाला एजंटाच्या माध्यमातून चार हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
Kolhapur Crime : कोल्हापुरात लाचखोरांची मालिका नव्या वर्षात सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाचीमध्ये ग्रामसेवकाला एजंटच्या माध्यमातून चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे कोल्हापुरात नव्या वर्षात पहिल्या लाचखोराची नोंद झाली आहे. ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भावकू भोगण (वय 50 वर्षे, सध्या रा. गंगाधाम सोसायटी, जाधववाडी, कोल्हापूर, मूळ कोवाड, ता. चंदगड) आणि शामराव ऊर्फ भारत बापू परमाज (वय 60 वर्।े, रा. शिरोली पुलाची) असे एजंटचे नाव आहे.
चिकन दुकान अतिक्रमणातून काढण्यासाठी मागितली लाच
तक्रारदाराच्या घराशेजारी चिकन विक्रीचे दुकान असून ते अतिक्रमणात होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढून घ्यावे, यासाठी ग्रामसेवकांना अर्ज दिला होता. त्यानंतर तक्रारदारही चिकन दुकान काढण्यासाठी ग्रामसेवकाकडे पाठपुरावा करत होता. मात्र, पंचायतची तक्रार आणि तक्रारदार करत असलेला पाठपुराव्याची सुद्धा दखल घेतली नाही. वारंवार भेट घेऊनही त्यांनी कारवाई केली.
ग्रामसेवक भोगणने अतिक्रमण काढण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी एजंटच्या माध्यमातून तक्रारदाराकडे केली. तडजोड करुन ही रक्कम चार हजार ठरली. ठरलेली रक्कम एजंट परमाजकडे देण्यास भोगण यांनी सांगितले होते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपतकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचत लाच घेताना परमाजला पकडले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, विकास माने, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनी कारवाई केली.
मागच्या पाच वर्षाची चौकशी करा
दरम्यान, ग्रामसेवक लाच घेताना जाळ्यात अडकल्यानंतर शिरोली पुलाची सरपंच पद्मजा करपे यांनी मागील पाच वर्षातील कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिरोली ग्रामपंचायतमधील पूर्वीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या कारवाईने ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. यामुळे चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी.
दुसरीकडे, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिरोली पुलाची ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. या ठिकाणी महाडिक गटाने पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाडिक गटाने एकहाती सत्ता मिळवताना सतेज पाटील गटाचा पराभव केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
