Raju Shetti : पुढील हंगामापासून साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न; साखर आयुक्तांची राजू शेट्टींना माहिती
Raju Shetti : पुढील ऊस गळीत हंगामापासून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.
Raju Shetti : पुढील ऊस गळीत हंगामापासून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करण्यासाठी (Sugar Factory Weigh Scale Online) प्रयत्न सुरु असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी म्हटले आहे. साखर कारखान्यांचे वजन काटे ॲानलाईन करण्यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांची पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी साखर आयुक्तांनी वरील माहिती दिली.
राजू शेट्टींकडून वजनकाटे ॲानलाईनसाठी आग्रही भूमिका
वजनकाटे ॲानलाईन करण्यासाठी याबाबत राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सातत्याने पाठपुरावा करुन अनेक तज्ञांच्या भेटी घेतल्या आहेत. संगणक अभियांत्रिकी तज्ज्ञ यांनी राज्यातील वजनकाट्यावर ऊस गाडी वजनास आल्यानंतर त्या ऊसाचे वजन एकाच वेळेस शेतकरी, साखर कारखाना आणि साखर आयुक्त यांना कळावे तसेच या वजनकाट्यात असलेल्या लोडसेलमध्ये कोणत्याही कारखान्याने छेडछाड केली तर त्याचे नियंत्रण साखर आयुक्त यांच्याकडे असल्याने याबाबत त्यांना तातडीने तसा मेसेज पोहोचवण्याची व्यवस्था या प्रणालीमध्ये करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पुढील आठवड्यापर्यंत संबंधित प्रणालीची प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाकडून तयार करुन वजन मापे महानियंत्रक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने आंदोलन
साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करण्याबाबत वजनकाटे महानिरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, राजू शेट्टींनी घेतली मुख्य सचिवांची भेट
दरम्यान, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येऊन महिना होवून गेला तरीही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मार्च अखेर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य शासनाकडे प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. घोषणेनंतर तब्बल एक महिन्यांनी पहिली यादी आली. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर जाऊन आधार प्रमाणिकरण केले, त्याचा संदेशही संबंधितांच्या मोबाईलवर आला, पण प्रत्यक्ष रक्कमच अजून खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या नियमानुसार ज्यादिवशी आधार प्रमाणीकरण होईल त्याच दिवशी ही रक्कम जमा होणार होती. म्हणून शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत, पण शासनाकडून निधीच न आल्याने ही रक्कम जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या