Kolhapur Crime : एकाच गावात दीड महिन्यात चार तरुणांची आत्महत्या; टोकाच्या निर्णयाने गावकरी हबकले
Kolhapur Crime : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यामध्ये विशेष करून तरुण तसेच महाविद्यालयीन तरुणींचे आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह (Kolhapur News) जिल्ह्यात तरुण आणि तरुणींच्या आत्महत्या (Kolhapur Crime) करण्याचे सत्र सुरुच आहे. करवीर तालुक्यातील वाकरे गावामध्ये (vakare, kolhapur) अवघ्या दीड महिन्यात चार उमद्या तरुणांनी आत्महत्या केल्याने गावकरी हबकून गेले आहेत. गावात समुपदेशन केल्यानंतरही विशाल रामचंद्र कांबळे (वय 26 वर्षे) या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. वाकरे गावात दीड महिन्यातील ही चौथी घटना आहे.
दीड महिन्यात चार तरुणांच्या आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार विशाल हा फरशी फिटिंग करण्याचे काम करत होता. झोपलेल्या खोलीतून विशाल बाहेर न आल्याने वडिलांनी आंघोळीसाठी त्याला हाक मारली. मात्र, विशालकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने वडिलांनी वर जाऊन पाहिले असता दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती करवीर पोलिसांना दिली. वाकरेत दीड महिन्यात चार तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तरुणांना मार्गदर्शन म्हणून समुपदेशन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यानंतर ही घटना घडल्याने गावकरी भीतीच्या छायेत आहेत.
कोल्हापुरात आत्महत्यांचे प्रमाण वाढले
दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये विशेष करुन तरुण तसेच महाविद्यालयीन तरुणींचे आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. दोनवडे (ता. करवीर) येथे एका तरुणीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. समृद्धी कृष्णात कदम (वय 18 वर्षे) असे तिचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धीने जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेतला. तातडीने तिला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
13 दिवसांपूर्वीच लष्करात कार्यरत असलेल्या जवानाने सुट्टीवर आल्यानंतर आत्महत्या केली होती. पन्हाळा तालुक्यात काखे गावामध्ये सत्यजीत खुडे या जवानाने घरीच आत्महत्या केली. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. सत्यजितच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबियांना धक्का बसला आहे. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किशोर मधुकर राऊत (वय 50 वर्षे) असे त्यांचे नाव आहे. ते एका बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. 29 नोव्हेंबर रोजी करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केली होती. यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या