Kolhapur News: मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा इशारा
Kolhapur News: मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला.
Kolhapur News: संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार सर्व कामे येत्या 10 जून पूर्वी पूर्ण करावीत, मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाने केलेल्या मान्सून पूर्व तयारीची माहिती दिली. रस्त्यावर पाणी येणाऱ्या ठिकाणी बॅरिकेड्स तसेच आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने केलेल्या नियोजनाची माहिती प्रसाद संकपाळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पूरप्रवण गावांमधील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एसटी बसेस त्या-त्या गावांमध्ये तैनात ठेवाव्यात. या बसेस सुस्थितीत असल्याची खात्री करा, जेणेकरुन त्या पावसाच्या पाण्याने बंद पडणार नाहीत. आवश्यक त्या ठिकाणी रुग्णवाहिका ठेवा.
धोकादायक झाडांच्या फांद्या काढा
त्यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन घ्या. नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होवू नये, यासाठी नदीतील भराव, कचरा काढून घ्या. धोकादायक इमारतींची जलदगतीने दुरुस्ती करुन घ्या. धोकादायक झाडांच्या फांद्या काढा. सर्व विभागांच्या नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक व टोल फ्री क्रमांक सुरु राहतील याची दक्षता घ्या. पाणीपुरवठा व वीज पुरवठा सुरळीत राहील, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या.
बी-बियाणे, खतांचा पुरेसा साठा तयार ठेवा
नदी, ओढ्याचे पाणी रस्त्यावर येणाऱ्या ठिकाणी नागरिक वाहने पाण्यात घालणार नाहीत, याची दक्षता घ्या. पाण्याखाली जाणाऱ्या पुलांच्या व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स व नागरिकांना माहिती देणारे बॅनर तयार ठेवा. भूस्खलन होणारे रस्ते, धोकादायक वळणांचे रस्ते, वाहन चालवताना वाहन चालकांना अडथळा निर्माण करणारी रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आदींची माहिती घेवून तत्काळ उपाययोजना करा. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करुन आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करा. जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यासाठीची कार्यवाही वेळेत करा. पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बि-बियाणे, खतांचा पुरेसा साठा तयार ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
आपत्कालीन परिस्थितीत काम करताना अडचण निर्माण होवू नये, यासाठी त्या त्या विभागांचे नियंत्रण कक्ष 24 तास सुरु ठेवून तीन शिफ्ट मध्ये कर्मचारी नियुक्त करा. या कालावधीत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपर्क क्रमांकासह यादी तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करा. 15 जून नंतर अधिकारी- कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करु नयेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, पशुसंवर्धन, विद्युत वितरण, परिवहन आदी विविध विभागांच्या तयारीचा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी आढावा घेऊन सूचना केल्या.
पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मर सुस्थितीत राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती देवून महावितरण विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता अंकुर कावळे यांनी दिली.