Ambabai Mandir Navratri : अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात, देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता
Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्य गर्भगृहात स्वच्छता झाल्यानंतर आज देवीला दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांबरोबरच खजिन्यातील खास दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये शिवकालीन कवड्याची माळ, 16 पदरी चंद्रहार, सोन्याची पालखी, बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल,सोन किरीट, बोरमाळ,कर्णफुले,मासोळी, चाफेकळी हार, कोल्हापुरी साज, मंगळसुत्र, 116 पुतळ्याची माळ, लप्पा, सात पदरी कंठी अशा अनेक दागिन्यांचा समावेश आहे. आज झालेल्या स्वच्छतेमुळे देवीच्या दागिन्यांना नवी झळाळी मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून अंबाबाई मंदिरामध्ये काल देवीच्या चांदीच्या दागिन्यांचे तसेच देवीच्या नित्य पूजेतील चांदीच्या भांड्यांची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर मनकर्णिका कुंडाची स्वच्छता पार पडली. यामध्ये प्रभावळ, अब्दागिरी, मोर्चेल, विविध आयुधे, पाट आदींचा समावेश आहे.
मंदिर परिसरातील स्वच्छतेलाही वेग
दरम्यान, मंदिर परिसरातील विद्युत यंत्रणा, झाडांच्या फांद्या छाटणे, विविध उपकरणांची स्वच्छता, सीसीटीव्ही यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची उपाययोजना यांसह विविध गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दर्शनरांगेसाठी मंडप उभारणीचेही काम सुरू करण्यात आले आहे.
मंदिर परिसर आणि शिखरांना रोषणाई
26 सप्टेंबरपासून अंबाबाई मंदिर नवरात्रौत्सवासाठी सज्ज होत असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागातून 25 लाखांवर भाविक कोल्हापुरातील मंदिराला भेट देतील अशी अपेक्षा आहे. धवारी गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर आणि शिखरांना रोषणाई करण्यात येणार आहे.
मंदिर परिसरात तातडीने डांबरी पॅचवर्क करावे
दुसरीकडे, लखीचा मार्ग व अंबाबाई मंदिर परिसरात तातडीने डांबरी पॅचवर्क करावे, भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. मुरुम व खडीद्वारे पार्किंग सुस्थितीत ठेवा, पोलिसांच्या सूचनेनुसार बॅरिकेडिंगची व्यवस्था करावी, पर्यटकांच्या माहितीसाठी शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या