(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambabai Mandir Navratri : नवरात्रीला अंबाबाई मंदिरावर ड्रोनची नजर, शहरात 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार
नवरात्रीला अंबाबाई देवीचे थेट दर्शन घेता यावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती शहरभरात 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवणार आहे. 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Ambabai Mandir Navratri : नवरात्रीला अंबाबाई देवीचे थेट दर्शन घेता यावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती शहरभरात 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवणार आहे. 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय मंदिराभोवती होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
देवीची मूर्ती, मंदिरातील विधी, पूजा, पालखी, नगर प्रदक्षिणा इत्यादींचे संपूर्ण शहरात बसविण्यात आलेल्या 10 एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण केले जाईल. मंदिर परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे.शेतकरी बाजार इमारतीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन केला जाईल, जेथे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन असतील. मंदिर परिसरात 80 कॅमेरे असून काही मोबाईल कॅमेरेही असणार आहेत.
ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार
शिवाय पालखी सोहळा, ललित पंचमी, नगर प्रदक्षिणा आणि दसरा सोहळ्यावर ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार आहे. उत्सवाच्या काळात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी 5 डोअर मेटल डिटेक्टर, 10 हँड मेटल डिटेक्टर आणि 15 वॉकी-टॉकी असतील. मंदिरात 58 सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांना पोलीस आणि होमगार्ड मदत करतील, अशी माहितीही शिवराज नायकडवडे यांनी दिली.
आजपासून मंदिर परिसर आणि शिखरांना रोषणाई
26 सप्टेंबरपासून अंबाबाई मंदिर नवरात्रौत्सवासाठी सज्ज होत असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागातून 25 लाखांवर भाविक कोल्हापुरातील मंदिराला भेट देतील अशी अपेक्षा आहे. बुधवारी गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी दागिन्यांची स्वच्छता आणि पॉलिश करण्याचे काम आज गरुड मंडप परिसरात होणार आहे. आजपासून मंदिर परिसर आणि शिखरांना रोषणाई करण्यात येणार आहे.
दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना पेड ई पासद्वारे दर्शन
नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई पास सुविधा दिली जाणार आहे. या उपक्रमाला काही संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, हा विरोध होत असला, तरी जिल्हाधिकारी राहुल रेखावार पेड ई पास उपक्रमावर ठाम आहेत. उत्सव काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने हे ई पास दिले जाणार आहेत. दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना या पेड ई पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे इतर भाविकांची कोणतीही गैरसोय नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या