Kolhapur news : खासदार धैर्यशील मानेंच्या रुकडीत धनगर कुटुंबांवर 28 वर्षांपासून बहिष्कार, बोलणाऱ्याला ३ हजारांचा दंड
Kolhapur : खासदार धैर्यशील माने यांच्या रुकडीमध्ये गेल्या 28 वर्षांपासून धनगर कुटुंबांवर बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालिबानी राजवटीप्रमाणे धनगर कुटुंबांवर बंधने घातली आहेत.

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Shahu maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरला (kolhapur) नेहमीच पुरोगामी म्हटले जाते. या जिल्ह्याने पुरोगामी भूमिकेला कधीच तिलांजली दिली नाही. किंबहुना त्यांचा आदर्श घालून देत अनेकांना त्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावाने विधवा प्रथेला बंदी घातली. त्याचा आदर्श ठाकरे सरकारने घेत अनेक गावांना त्यांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. जिल्ह्यातील जातीय आणि धार्मिक सलोख्याचेही अनेक प्रसंग या राज्याने पाहिले आहेत.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे खासदारांच्या गावातच गेल्या 28 वर्षांपासून धनगर कुटुंबांवर बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिवसेना खासदार धैर्यशील माने (Shiv sena MP Dhairyasheel Mane) यांच्या रुकडीमध्ये (Rukdi) हा सर्व प्रकार सुरू आहे. जात पंचायतीने तालिबानी राजवटीप्रमाणे धनगर कुटुंबांवर बंधने घातली आहेत. तुघलकी फतव्यामध्ये वाळीत टाकलेल्या कुटुंबांसोबत कोणी बोलायचे नाही. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. इतकंच काय त्यांच्यातील निष्पाप मुलं शाळेत गेल्यास त्यांच्याशी सुद्धा बोलायचे नाही असे फर्मान आहे.
गोष्ट इतक्यावरच थांबत नाही, तर बोलणाऱ्याला हजारांवर दंड ठोठावला जातो, तर अशा प्रकारची माहिती देणाऱ्यालाही 'बक्षिसी' दिली जाते. या प्रकरणात निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. मंदिरामध्ये पुजा करण्यावरूनही वाद झाल्यानंतर त्या कुटुंबाना वाळीत टाकण्यात आले आहे.
जवानाने आवाज उठवला, तर त्यांच्याही कुटुंबाला वाळीत टाकले
वाळीत टाकणाऱ्यांची मग्रुरी इतकी आहे, की त्यांनी या संपूर्ण प्रकाराला विरोध करणाऱ्या लष्करातील जवानाला सुद्धा आता वाळित टाकण्यात आले आहे. एका पीडित मुलीने आपली व्यथा सांगताना सांगितले की, गेल्या 6 वर्षांपासून आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. शाळेत गेल्यानंतरही कोणी बोलत नाही. कोणी बोलल्यास लगेच येऊन सांगितले जाते. माझ्या एका मैत्रिणीला बोलले म्हणून दंड करण्यात आला. आणखी एका वृद्ध महिलेने बोलताना सांगितले की, आम्हाला गेल्या सात आठ वर्षांपासून वाळीत टाकलं आहे. मंदिरात येऊ देत नाहीत. कोणी बोलत नाही. कोणीही वारल्यानंतर येत नाही. दंड आकारण्यासाठी भीती घातली जाते.
मी सैन्यात असताना माझ्या कुटुंबावर बहिष्कार
पीडितांमध्ये लष्करात (Indian Army) असलेल्या जवानाला सुद्धा बहिष्काराचा सामना करावा लागला आहे. ते म्हणाले, मी सैन्यात असताना माझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. माझ्या कुटुंबाशी कोणी बोलत नाही, बोलल्यास लगेच फोन येतो का बोललास म्हणून. दंड द्या म्हणून विचारणा केली जाते. आम्हाला मंदिरामध्ये येऊ दिलं जात नाही. पुजाही करून दिली जात नाही. आमचा धार्मिक अधिकार काढून घेतला आहे.
पोलिसांनी पुरावे मागितले
देशसेवा करत असतानाच असा प्रसंग घरी येत असेल, तर देशसेवा कशी करायची उद्विग्न प्रतिक्रिया पीडित जवानाने दिली. हे असच होत राहिल्यास देशात हुकूमशाही निर्माण होईल. जात पंचायतकडून सातत्याने दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त सात ते आठ कुटुंबांनी न्याय मागितला आहे, पण सगळाच समाज पीडित असल्याचे ते म्हणाले. या विरोधात हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये वडील गेले असता त्यांनाही टोलवाटोलवीची उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आपल्याकडे पुरावे मागितल्याचेही जवानाने सांगितले.
हे ही वाचलं का ?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
