Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना रस्ता मोकळा करून देताना कोल्हापुरात पोलिसाचे 'हात' सरसावले, वाहनधारकाला कानशिलात लगावली
वाहनांच्या भाऊगर्दीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) वाहनांचा ताफा अडकल्याने पोलीसांची एकच ताराबंळ उडाली. याचवेळी एका वाहनधारकाला बाजूला करताना एका पोलीसाने वाहनधारकाला थेट कानशिलात लगावली.
कोल्हापूर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोल्हापूर दौऱ्यावर असताना ते करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले. दर्शन घेऊन झाल्यानंतर भाऊसिंगजी रोडच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. चिंचोळ्या भाऊसिंगजी रोडवर वाहतूक कोंडी ही काही नवीन बाब नाही. सर्वसामान्यांना दररोज कसरत करूनच वाट काढावी लागते.
त्याच रोडवर वाहनांच्या भाऊगर्दीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वाहनांचा ताफा अडकल्याने पोलिसांची एकच ताराबंळ उडाली. त्यामुळे पोलिस तत्परतेने वाहने बाजूला करत होते. याचवेळी एका वाहनधारकाला बाजूला करताना एका पोलिसाने वाहनधारकाला थेट कानशिलात लगावली. ज्या वाहनधारकाला कानशिलात लगावली तो वाहनधारक सुद्धा गर्दीत अडकला होता, तरीही मंत्र्यांच्या ताफ्याला वाट काढताना संतापलेल्या पोलिसाने त्याला कानशिलात लावून त्याला रस्त्यावर प्रसाद दिला.
सर्वसामान्यांची खराब रस्ते आणि दररोजची वाहतूक कोंडीने होत असलेली फरफट नवीन नसताना मंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाट मोकळी करण्यासाठी पोलिसाने दिलेली कानशिलात चर्चेची विषय ठरली आहे. या प्रकरणात आता कानशिलातचा प्रसाद देणाऱ्या पोलिसावर कारवाई होईल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आव्हाड संजय राऊतांचा हात उंचावत म्हणाले, आमचं ठरलंय
शिवसेना खासदार संजय शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उभय नेत्यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली. या भेटीवेळी जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचा हात उंचावत आमचं ठरलंय असे म्हणाले. त्यांच्या या वाक्यावरून सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष्य केले होते. चाव्या आमच्याकडे आहेत असे राऊत म्हणाले होते. त्यामुळे सतेज पाटलांची आमचं ठरलंय टॅगलाईन वापरून राऊत आणि आव्हाड नेमका काय संदेश देऊ इच्छित आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.
हे ही वाचलं का ?