Kolhapur News : प्रतीपंढरपूर नंदवाळमध्ये पहिल्यांदा वाघ मग बिबट्या आल्याची चर्चा रंगली, पण निघाला भलताच प्राणी!
Kolhapur News : कोल्हापूर शहराच्या वेशीवर आज पहिल्यांदा वाघ मग त्यानंतर काही वेळाने बिबट्या आल्याची चर्चा रंगली. याची चर्चा पंचक्रोशीत पसरताच शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.
Kolhapur News : कोल्हापूर शहराच्या वेशीवर आज पहिल्यांदा वाघ मग त्यानंतर काही वेळाने बिबट्या आल्याची चर्चा रंगली. याची चर्चा पंचक्रोशीत पसरताच शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. मात्र वनविभागाने केलेल्या पाहणीत ना वाघ दिसून आला ना बिबट्या दिसून आला. वन विभाग व रेस्क्यू टीमकडून केलेल्या पाहणीनंतर तरस असल्याचे पायाच्या ठशावरून स्पष्ट करण्यात आले.
कोल्हापूर शहराच्या वेशीवर असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळ व कांडगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या नागटेक डोंगर परिसरात सकाळी बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. शेतकरी बाजीराव शिंदे यांना शेताच्या बांधावर बिबट्यासदृश प्राणी बसल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ ही माहिती गावातील नागरिकांना तसेच पंचायतीला दिली.
ग्रामसेवक उत्तम पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनखात्याचे पथकही तपासासाठी परिसरात दाखल झाले. वनक्षेत्रपाल विजय पाटील, रमेश कांबळे, वनरक्षक राहुल झेनवाल आणि रेस्क्यू टीमच्या वतीने याबाबत पाहणी केली. त्या ठिकाणी उमटलेल्या पायाच्या ठशांवरून हा प्राणी बिबट्या किंवा वाघ नसून तरस असल्याचे निष्पन्न झाले.
वनविभाग व रेस्क्यू फोर्सने परिसर पिंजून काढून या प्राण्याच्या पायांच्या ठस्यावरून हा बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट करताच ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. मात्र, सोशल मीडियावर वाघ आल्याच्या अफवेने परिसरात भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे ग्रामस्थांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या