वारी सुरु असताना मला दिलासा मिळाला, आंधळ्याच्या गाई देव राखी, त्यामुळे माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा; ईडीच्या तावडीतून सुटका होताच हसन मुश्रीफांची कळी खुलली
मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपकडून आणि विशेषतः सोमय्यांकडून आरोपांची राळ उठवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर आम्हाला गोळ्या घाला अशी हताश प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली होती.

Hasan Mushrif on ED: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना शेअर्सच्या नावाखाली फसवणूक केल्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला होता. ईडीकडून 40 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोपांची मालिका केली होती. मात्र, आता याच प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ यांना क्लीन चीट मिळाली आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या कागल पोलिसांकडून मुश्रीफ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली काढली. त्यामुळे मोठा दिलासा हसन मुश्रीफ यांना मिळाला आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपकडून आणि विशेषतः सोमय्यांकडून आरोपांची राळ उठवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर आम्हाला गोळ्या घाला अशी हताश प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली होती.
वारी सुरू असतानाच मला हा दिलासा मिळाला
ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, परमेश्वर महान आहे. असं म्हणतात की आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखी, त्यामुळे माझ्या गायी सुद्धा परमेश्वर राखत असावा. गोरगरिबांचा आशीर्वाद आणि वारी सुरू असतानाच मला हा दिलासा मिळाला. राजर्षी शाहू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मला दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित मुश्रीफ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळताना अटकेपासून केवळ तीन दिवसांचे संरक्षण दिले. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 10 मार्च 2023 रोजी पुढील आदेशापर्यंत ते कायम ठेवले होते; तर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्यातही हायकोर्टाने अंतरिम संरक्षण दिले होते. ते आजतागायत कायम होते. दरम्यान, मुश्रीफ यांनी हा गुन्हा रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली, यावेळी सरकारी वकील आशिष सातपुते यांनी याप्रकरणी पोलिसांनी कागल न्यायालयात सी-समरी (क्लोजर रिपोर्ट) अहवाल सादर केला असल्याची माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत खंडपीठाने मुश्रीफ यांची याचिका निकाली काढली. हा मुश्रीफांना दिलासा मानला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























