(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasan Mushrif : 'गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर...' चंदगडमधील उमेदवारीवरून मुश्रीफ कडाडले!
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र रविवारी शिवाजी पाटील यांनी चंदगडमध्ये मेळावा घेत राजेश पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं आहे.
कोल्हापूर : गोव्याचे मुख्यमंत्री चंदगडमध्ये येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असतील तर ते योग्य नसल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. चंदगडमध्ये उमेदवारीवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपमधील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपने शिवाजी पाटील चंदगडमधून इच्छुक आहेत. 2019 मध्येही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवताना चांगली लढत दिली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.
हसन मुश्रीफ यांची नाराजी
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र रविवारी शिवाजी पाटील यांनी चंदगडमध्ये मेळावा घेत राजेश पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगडमध्ये येऊनच त्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे. असं असतानाही गोव्याचे मुख्यमंत्री येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर ते योग्य नसल्याचे हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यासाठी भूमिपूजन
दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये आगीच्या बेचिराख झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यासाठी आज भूमिपूजन पार झाले. या कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ आज सकाळीच केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी कोणताही सुरक्षा न घेता आले होते. ते म्हणाले की, केशवराव भोसले आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर रेकॉर्ड वेळेमध्ये प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडूनच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कामाला सुरुवात झाल्याचा आनंद आहे. मात्र, समाधान व्हायचं असल्याचे त्यांनी नमूद केलं.
ते म्हणाले की, या नाट्यगृहाचे भूमिपूजन मी आणि खासदार शाहू महाराजांच्या हस्ते संपन्न झाले. दगड, चुना, माती, सिमेंटची इमारत आहे. त्यामुळे इमारतीमध्ये तमाम कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. दीड वर्षांच्या आत ही इमारत पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेही आभार मानले. इमारतीला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ आणि इमारत दिमाखात उभी राहील असे त्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या