Shahu Maharaj Jayanti 2024 : राजर्षी शाहू महाराजांना 150 व्या जयंतीनिमित्त मरणोत्तर भारतरत्न द्या : हसन मुश्रीफ
Shahu Maharaj Jayanti 2024 : राजर्षी शाहू महाराजा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मातीत सामाजिक समतेची प्रतिष्ठापणा, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj Jayanti 2024 ) यांची आज 150 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त कोल्हापूरसह राज्यभरात आणि राजधानी नवी दिल्लीत देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत असल्याचं म्हटलं.
राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या : हसन मुश्रीफ
राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती राज्यभरात उत्साहानं साजरी केले जात आहे. आताच त्यांच्या जन्मस्थळी त्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम करणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं, त्यांनी रयतेचं राज्य कोल्हापूरमध्ये कसं उभं केलं हे देशाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेचं राज्य कसं असावं, ते जनतेसाठी कसं चालवावं याचा आदर्श नमुना या दोन्ही राजांनी आपल्यासमोर घालून दिलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या 150 जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरचा पालकमंत्री या नात्यानं शुभेच्छा देतो, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर केलेलं काम, समाजसेवेचं काम, सर्वक्षेत्रात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी केलेलं काम, विशेषत: समतेचा विचार जगभर पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया, हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी पुढं म्हटलं की, राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्तानं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना विनंती करतो की राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
संजय राऊत यांचं समर्थन
छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी कोणी करत असेल तर त्यात टीका करावी असं काय आहे. राजर्षी शाहू महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत. ते शोषितांचे राजे, गरिबांचे राजे होते, रयतेचे राजे होते, असं संजय राऊत म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी भारतरत्न पुरस्कारासंदर्भात घेतलेल्या भूमिकेला संजय राऊत यांनी देखील समर्थन दिलं आहे.
इतर बातम्या :
विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित; महायुतीचा तिढा कायम?