Ambabai Mandir Navratri : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
कोल्हापूर शाही दसरा महोत्सव यंदा राज्य सरकारच्या सहभागाने भव्य स्वरुपात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
Ambabai Mandir Navratri : कोल्हापूर शाही दसरा महोत्सव यंदा राज्य सरकारच्या सहभागाने भव्य स्वरुपात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
कोल्हापूरचा शाही दसऱ्याला ऐतिहासिक अशी परंपरा आहे. हा सोहळा आता राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. यंदा पहिल्यांदाच कोल्हापूरचा शाही दसरा दोन दिवस साजरा होत आहे. ऐन दसरा सुरु असतानाच शासन निर्णय झाल्याने जिल्हा नियोजन मंडळातून 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
अंबाबाई मंदिरात भक्तीचा महापूर, 23 लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन
दुसरीकडे तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम मोडित निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील अशा अंदाजाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी भेट दिली.
देवस्थान समितीकडून ऑनलाईन दर्शनाची सुद्धा सोय करण्यात आली होती. या माध्यमातून 42 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दुसरीकडे सप्तमीला अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीकडून 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा करण्यात आला. तथापि, या आकड्यावरून मत मतांतरे आहेत. कारण तीन लाखांवर भाविक गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली 12 ठिकाणची पार्किंग व्यवस्था कोलमडली होती. शहरातील वाहतुकीवरही ताण निर्माण झाला होता. त्यामुळे त्या दिवशीच्या आकडेवारीबाबत साशंकता आहे.
अंबामातेची नऊ दिवसांमध्ये खालील स्वरुपात पूजा बांधण्यात आली
- पहिल्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची सिंहासनारूढ या रूपात पूजा बांधण्यात आली.
- द्वितीय माळेला अंबाबाईची दुर्गा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
- तृतीय माळेला अंबाबाईची सिद्धीदेवी रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली.
- चौथ्या माळेला अंबाबाईची मदुराई निवासिनी मीनाक्षीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली.
- ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली.
- सहाव्या माळेला अंबाबाईची भक्ती मुक्ती प्रदायिनीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.
- सप्तमी तिथीला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.
- अष्टमी तिथीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली.
- नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या