Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरकर सीमोल्लंघनासाठी सज्ज; ऐतिहासिक दसरा चौक तब्बल दोन वर्षांनी गर्दीचा रोमांच अनुभवणार
Kolhapur Shahi Dasara : कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या कोल्हापूर शाही दसऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे दसरा चौकासह परिसर दोन वर्षांनी गजबजणार आहे.
Kolhapur Shahi Dasara : कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या कोल्हापूर शाही दसऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे दसरा चौकासह परिसर दोन वर्षांनी गजबजणार आहे. यंदाच्या सोहळ्यामध्ये शासनाचाही सहभाग असल्याने दसरा आणखी सोनेरी होणार आहे. त्यामुळे यंदा शाहू महाराज राजघराणे आणि जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी दिवसभर तयारीची लगभग सुरु होती.
मुख्य चौकात लकडकोट बांधणी, ध्वजासह शामियाना उभारणी करण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी शमीपूजन सोहळा शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. शमीचे पूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. मैदानाच्या मध्यभागी लकडकोट बांधण्यात आला आहे. दरम्यान, दसरा चौकातील सोहळा पाहण्यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत.
बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, गुरुमहाराज यांच्या पालख्या जुना राजवाड्यातून दसरा चौकाकडे मार्गस्थ होतील. यासोबत तोफ, उंट, घोडे, मानकरी सहभागी होतील. पालखी दसरा चौकात येत असतानाच राजवाड्याकडून शाहू महाराज यांचे मेबॅक गाडीतून लवाजम्यासह दसरा चौकात आगमन होईल.
सोहळ्यानंतर परंपरेनुसार श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम, गंगावेस परिसरातून फिरून पुन्हा मंदिरात जाईल. दरम्यान, यंदाच्या शाही दसरा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरावा, यासाठी पारंपरिक लवाजम्याबरोबरच भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
मिरवणूक मार्गावर विविध कला प्रकारांचे सादरीकरण
आज दुपारपासून मिरवणूक मार्गावर विविध कला प्रकारांचे सादरीकरण होईल. चित्ररथ, लेझीम, ढोलपथक, धनगरी ढोल, गजनृत्य, मलखांब, कुस्तीची प्रात्यक्षिके, पोवाडा तसेच विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूला एनसीसीचे विद्यार्थी मिरवणुकीत पुष्पवृष्टी करतील. या ठिकाणी बचत गटांचे स्टॉल्स असणार आहेत. न्यू पॅलेस ते दसरा चौक मार्गावर मोटारसायकल टीम व पोलिस विभागाचे पथक बुलेट व जीपसह सहभागी होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या