Kolhapur Municipal Corporation : शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्रातील गळती शोधण्यात कोल्हापूर महानगरपालिकेला अपयश
कोल्हापूर मनपाला शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राच्या (Shingnapur pumping station) मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळती शोधण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अपयश आलं आहे.
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर (Kolhapur Municipal Corporation) शहराच्या जवळपास ७० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर अशुद्ध पाणी उपसा केंद्राच्या (Shingnapur pumping station) मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमधील गळती शोधण्यात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे गळती शोधण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका पुढील आठवड्यात उपसा केंद्र पुन्हा बंद करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील आठवड्यात गळती शोधण्यासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
मुख्य वितरण नलिकेत गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून गळती दूर करण्यासाठी सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवला होता. तथापि, अधिकाऱ्यांना 1,100 मिमी पाइपलाईनमधील गळतीची नेमकी ठिकाणे शोधण्यात अपयश आले. कोल्हापूर मनपाचे मुख्य हायड्रॉलिक अभियंता हर्षित घाटगे म्हणाले की, “दिवसभर पाईपलाईनचा भाग खोदण्यात घालवला होता. मात्र, गळतीचे ठिकाण आढळून आले नाही. दुसरीकडे पाणीपुरवठा करण्यासाठी सोमवारी चार टँकरने 21 फेऱ्या केल्या. बहुतांश टँकर उपनगरे आणि झोपडपट्टी भागात तैनात करण्यात आले होते.
दरम्यान कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा दोन वितरण नलिकांना गळती लागल्याने गेले चार दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सोमवारी बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा ठप्प होता. कसबा बावडा फिल्टर हाऊस आणि कळंबा फिल्टर हाऊस मधून एकूण 21 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच वणवण करावी लागली. आजही अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा झाला.
हरिओम नगरला जाणाऱ्या नलिकेला लागलेली गळती लागल्याने शनिवारी ए, बी आणि ई वार्डातील पाणीपुरवठा बंद होता. त्या वितरण नलिकेची गळती काढण्यात आल्यानंतर शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्रातील (Shingnapur pumping station) गळती काढण्यासाठी सोमवारी ए बी आणि ई वाॅर्डातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या