kolhapur expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे; आमदार जयश्री जाधवांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
जयश्री जाधव यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, असा बॅनर विधानसभेच्या पायऱ्यांवर झळकावत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मार्च महिन्यामध्येही त्यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती.
Kolhapur City Expansion: गेल्या पाच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज (3 ऑगस्ट) विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत लक्ष वेधले. आतापर्यंत हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन, लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही निर्णय झालेला नाही. जयश्री जाधव यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, असा बॅनर विधानसभेच्या पायऱ्यांवर झळकावत राज्य सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मार्च महिन्यामध्येही त्यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची मागणी केली होती.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ 50 वर्षांपासून रखडली आहे. त्यातून राज्य व केंद्राच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत असल्याने विकास खुंटला आहे. महापालिकेने 2013 पासून 2021 पर्यंत चारवेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. 2014 मध्ये 17 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्या साऱ्यांवर सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागवला होता. त्यानुसार फेब्रुवारी 2021 मध्ये 18 गावे व दोन एमआयडीसींसह प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शहराची वाढ नसल्याने नवे उद्योग येत नाहीत.
कोल्हापूर महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी 2021 मध्ये 18 गावे व दोन एमआयडीसींसह पाठवलेला प्रस्ताव, तसेच 1972 नंतर आजतागायत शहराची हद्दवाढ झाली नसल्याची 81 सदस्य संख्येची माहिती पाठवली आहे. मनपा प्रशासनाने 2013 पासून 2021 पर्यंत 4 वेळा प्रस्ताव पाठवले आहेत. महापालिकेने 17 गावांचा समावेश करून राज्य शासनाकडे 2014 मध्ये प्रस्ताव सादर केला होता. पण सरकारकडून 2017 मध्ये 42 गावांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे शहराची हद्दवाढ पुन्हा थांबली होती. त्यानंतर 2021 मध्ये महापालिकेने नवीन प्रस्ताव सादर केला होता.
प्रस्तावात या गावांचा समावेश
मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, शिरोली, उंचगाव, शिंगणापूर, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी या 18 गावांसह गोकुळ शिरगाव व शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश आहे.
प्राधिकरणाचाही खेळ फसला
प्राधिकरण स्थापन करण्यात आले असले, तरी त्याचा पुरता फज्जा उडाला आहे. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार झाला आहे. प्राधिकरणातून कोणत्याही प्रकारे दाखले मिळत नसल्याने आणि गावांमधून ग्रामपंचायतीमधूनही तीच अवस्था झाल्याने शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या