Ajit Pawar : मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळ गडावर जाणार, सरकारचा पहिला प्रतिनिधी गडावर पोहोचणार!
Ajit Pawar : गेल्या चार दिवसांपासून विशाळगडचा मुद्दा तापला असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज विशाळगडावर पोहोचणार आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडवर अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामध्ये 14 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या आणि अतिक्रमणाशी दुरान्वये सुद्धा संबंध नसलेल्या गजापुरामध्ये आलेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. कुटुंबिक साहित्याची नासधूस केली होती. तसेच गाड्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून विशाळगडचा मुद्दा तापला असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज विशाळगडावर पोहोचणार आहेत. विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार आज सायंकाळी गडावर पोहोचणार आहेत. या ठिकाणी अजित पवार काय बोलतात याकडे लक्ष असेल.
तत्पूर्वी 14 जुलै रोजी छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिली होती. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, संभाजीराजे हे समर्थकांसह गडावर पोहोचण्यापूर्वीच रवींद्र पडवळांच्या चिथावणीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गजापुरात हिंसा केली होती. रवींद्र पडवळसह कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्यावर ही जमावाला भडकवण्याचा आरोप आहे. दंगलीनंतर फरार झालेल्या त्यांच्या शोधासाठी पथके सुद्धा रवाना करण्यात आली आहेत.
शाहू महाराजांकडून पाहणी
दरम्यान, झालेले हिंसाचारग्रस्त भागाची खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गजापुरात पाहणी करत मदतीचा हात दिला होता. यावेळी संबंध नसताना प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याने महिलांनी एकच टाहो फोडला होता. यावेळी महाराज सुद्धा झालेलं नुकसान पाहून गलबलून गेले होते. आक्रमक भूमिका घेतलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होते.
बंडा साळोखे, रवीद्र पडवळकडून दंगलीसाठी चिथावणी
संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले होते. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी चिथावणी दिल्याचे काही व्हिडितून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणाऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या