Amol Palekar : अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध ` पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा वि. स. खांडेकर पुरस्कार जाहीर
Amol Palekar : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडून दिला जाणारा वि. स. खांडेकर पुरस्कार अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध ` पुस्तकाला जाहीर झाला आहे.

कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी अमोल पालेकर यांच्या `ऐवज:एक स्मृतिबंध ` या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार प्रदान समारंभ 24 मे रोजी कोल्हापुरात होणार आहे.
पाटण (सातारा) येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांनी आपले वडिल मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडे काही रक्कम ठेव म्हणून ठेवली आहे. त्या रकमेतून प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. कादंबरी, कथा, ललित आणि आत्मचरित्र यापैकी कोणत्याही वाड्.मयप्रकारातील त्या वर्षीच्या उत्कृष्ट पुस्तकास हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी पालेकर यांच्या ऐवज एक स्मृतिबंध या पुस्तकाची निवड करण्यात आली असून हे पुस्तक मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ आणि डॉ. विजय चोरमारे यांच्या निवड समितीने ही निवड केली.
पुरस्कार प्रदान समारंभ बुधवार दि.24 मे 2025 रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक,कोल्हापूर येथे होणार आहे, अशी माहिती साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे.
अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रकार असलेले अमोल पालेकर हे भारतीय पातळीवरील महत्त्वाचे कलावंत आहेत. या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख आहे. ‘ऐवज एक स्मृतिबंध’ या पुस्तकातून पालेकर यांचा कलाप्रवास उलगडला आहेच, शिवाय एका संवेदनशील कलावंताच्या वैचारिक भूमिकेचेही दर्शन प्रवाहीपणे घडते. आजच्या काळातील या पुस्तकाचे मोल आणि महत्त्व लक्षात घेऊन त्याची वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे निवड समितीने म्हटले आहे.
इतर बातम्या :























