Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक कोल्हापुरात, मराठा समाजाने हसन मुश्रीफांना रोखल्याने दौऱ्याची पोलिसांकडून प्रचंड गुप्तता!
Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे कणेरी मठावर जाऊन भेट देणार आहेत.
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (28 ऑक्टोबर) अचानक कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यामुळे मंत्र्यांपासून ते आमदार, खासदांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच मराठा क्रांती मोर्चाने कडाडून विरोध केल्याने दौरा रद्द करावा लागला आहे. त्यामुळे परिस्थिती किती टोकाला जाऊन पोहोचली आहे, याची कल्पना येते.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे कणेरी मठावर जाऊन भेट देणार आहेत. या दौऱ्याची कोल्हापूर पोलिसांकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसांकडून या संदर्भात कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मठावर जाण्याचे काय कारण असावे, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मठावर साजरा करण्यात आलेल्या लोकोत्सावात सहभागी होण्यासाठी फेब्रुवारीमध्ये आले होते. त्यानंतर हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी भेट होत आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये ते कशासाठी भेट घेत आहेत किंवा खासगी दौरा आहे का? या संदर्भाने सुद्धा माहिती मिळू शकलेली नाही.
कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला!
दरम्यान, कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काल (27 ऑक्टोबर) दोनदा अडवून जाब विचारण्यात आला. आता मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकामध्ये उद्या रविवारी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत.
कोल्हापूरमध्येही राजकीय पुढाऱ्यांना आता प्रवेशबंदी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. त्या गावांमध्ये जोवर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात न येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावोगावी असे अनेक फलक उभा राहून राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुढाऱ्यांना बंदी घातलेल्या गावांमध्ये राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे, चंदगड तालुक्यातील निठूर, शाहुवाडी तालुक्यातील रेठरे वारणा, राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे, कागल तालुक्यातील हळदवडे आणि एकोंडी, करवीर तालुक्यातील इस्पूर्ली, नंदगाव, चुये, येवती, हणबरवाडी, म्हाळुंगे, पाडळी खुर्द या गावांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या