Kolhapur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यात येत आहेत. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' अभियान राबविण्यात येत आहे.
Kolhapur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 मे रोजी कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत. 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानात सायंकाळी पाच वाजता शिंदे आणि फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यात येत आहेत. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' अभियान राबविण्यात येत आहे. या योजना संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम कोल्हापूर जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 75 हजार नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवल्या जाणार आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा गांधी मैदानात 28 मे रोजी पार पडणार होती. महाविकास आघाडीच्या यापूर्वी राज्यामध्ये तीन वज्रमूठ सभा पार पडल्या आहेत. मात्र, मे महिन्यातील रणरणत्या उन्हामुळे सभा स्थगित करण्यात आल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 28 मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा कोल्हापूरमध्ये होणार होती. मात्र, या सभेला स्थगिती देण्यात आली आहे. ही सभा आता जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात भाजप शिंदे गटासमोर आव्हान
दुसरीकडे, कोल्हापुरात भाजप आणि शिंदे गटासमोर महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी तगडे आव्हान असणार आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात आहेत, तर आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरही शिंदे गटात आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके सुद्धा शिंदे गटात आहेत. तथापि, भाजपची कोल्हापूर जिल्ह्यातील तयारी पाहता दोन्ही खासदार भाजपच्याच चिन्हावर लढण्याची शक्यता आहे.
भाजपचा कोल्हापुरात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नाही. धनंजय महाडिक राज्यसभा खासदार झाल्याने भाजपला बळ आले आहे. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीवर कोल्हापुरातून 14 जणांना संधी मिळाली आहे. यामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. महेश जाधव यांची सचिवपदी बढती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये ओबीसी सेलचे संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगुले आणि डॉ. संतोष चौधरी यांचा समावेश आहे. निमंत्रित सदस्यांमध्ये माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबा देसाई, संग्राम कुपेकर यांचा समावेश आहे. कुपेकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
निमंत्रित सदस्यांमध्ये माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, शिरोळचे पृथ्वीराज यादव, डॉ. अरविंद माने, विजयेंद्र माने यांचा समावेश आहे. निवडींमधून कोल्हापूर भाजपमधील सर्वच नेत्यांच्या गटांना संधी देण्यात आली आहे. सचिन तोडकर यांचीही प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या