Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
Leopard In Kolhapur: वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आला. बिबट्या दिसून आल्याने अणदूर-धुंदवडे या मार्गाव प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे.

Leopard In Kolhapur: कोल्हापूर शहरात भरदिवसा बिबट्याने थरकाप उडवल्यानंतर अनेकांची भंबेरी उडाली. बिबट्या कैद झाल्यानंतर शहरवासियांनी सुटेकचा नि:श्वास सोडला. हा थरकाप ताजा असतानाच अणदूरमधील (ता.गगनबावडा) कावळटेक धनगरवाड्यावर बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाला. शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या मालकीचा बैल बिबट्याने फस्त करत ठार मारला. बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गगनबावडा वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. ट्रॅप कॅमेरात हा बिबट्या कैद झाला आहे.
हरवलेल्या बैलाचा शोध घेताना हल्ला केल्याचे समोर
कावळटेक वस्तीवरील शेतकरी पाळीव जनावरांना डोंगरदरीत चरण्यासाठी सोडतात. यावेळी जंगलात विठ्ठल शेळके यांचा बैल हरवला होता. बैलाचा शोध घेतला असता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. गगनबावडा वनविभागाचे वनरक्षक प्रकाश खाडे, सूर्यकांत गुरव, वन कर्मचारी तसेच रिस्कु टीम व पशु अधिकारी यांनी जागेवर जाऊन या घटनेचा पंचनामा केला. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आला. बिबट्या दिसून आल्याने अणदूर-धुंदवडे या मार्गाव प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे. बिबट्याचा वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापुरात बिबट्याचा थरार
दरम्यान, कोल्हापुरात ताराबाई पार्कमध्ये काल (11 नोव्हेंबर) दुपारी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याने पोलिस, वनकर्मचाऱ्यासह हॉटेलच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.बिबट्या आल्याची वर्दी मिळताच बघ्यांची गर्दी एकच जमली आणि बिबट्या दिसेल त्या मार्गाने पळून जाऊ लागला. ‘महावितरण’च्या आवारात ड्रेनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाज्यातून आत घुसला. तब्बल तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपुरीचे पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर हे जखमी झाले. खोंदल यांना जास्त दुखापत झाली आहे.
बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले
ड्रेनेजच्या चेंबरमध्ये बिबट्या घुसल्यामुळे बिबट्या आत लपून बसला होता. चेंबरच्या एकाबाजूला प्लायवूड टाकून ते बंद केले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाळी लावली. बिबट्याने हल्ल्याच्या तयारीत उसळी मारून जाळीच्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच कर्मचाऱ्यांनी त्याला दाबून धरले आणि जाळीत जेरबंद केले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी गनने प्राथमिक स्तरावरील भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले, त्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. त्यानंतर त्याच्या पायात हातातील सिरींजने दुसरे इंजेक्शन टोचण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध बिबट्याला उचलून पिंजऱ्यात ठेवण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या























