(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bajirao Khade : कोल्हापुरातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित
करवीर तालुक्यातील सांगरुळमधील बाजीराव खाडे गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रीय आहेत. त्यांनी युवक काँग्रेस पासून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेला (Kolhapur Loksabha) बंडखोरी केलेल्या काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांचं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे. कोल्हापूर काँग्रेसकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी
कोल्हापूर लोकसभेसाठी थेट शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक असा सामना होत आहे. शाहू महाराज यांना ओबीसी, वंचित तसेच एमआयएमकडून पाठिंबा देण्यात आला आहे. अशा स्थितीत बाजीराव खाडे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या बाजीराव खाडे यांनी केलेल्या बंडखोरीने त्यांच्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी केली होती. खाडे यांनी माघार घेण्यासाठी पंधरा-वीस दिवस मनधरणी सुरु होती, मात्र,पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्यांना बेदखल केलं जात असून स्वाभिमानासाठी मैदानात उतरल्याची घोषणा केली होती. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना रडू कोसळले होते.
कोण आहेत बाजीराव खाडे?
करवीर तालुक्यातील सांगरुळमधील बाजीराव खाडे गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रीय आहेत. त्यांनी युवक काँग्रेस पासून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विविध राज्यांची जबाबदारीही दिली होती. दीड वर्षांपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु केली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात दौरा केला होता.
काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रतीक्षा असताना खाडे यांनी बॅनरबाजी करत लक्ष वेधले होते. कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्याने नेतृत्व आपला विचार करेल, अशी आशा होती. तथापि, काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर मतदारसंघ मिळवत शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली. यानंतरबी बाजीराव खाडे भेटीगाठी सुरुच ठेवल्या होत्या. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांसह निरीक्षक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या