(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात गावचे कारभारी ठरवण्यासाठी सतेज पाटील, नरके, मुश्रीफ, माने, यड्रावकर गटाचा सर्वाधिक कस लागणार!
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. करवीर, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील गावगाड्यावर आजपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा सुरु झाला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी जिल्ह्यातील तालुकानिहाय लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी तसेच तिरंगी लढतीचे चित्र आहे. जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांचा प्रभाव असलेल्या पन्हाळा तालुक्याचा अपवाद वगळल्यास हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवस प्रत्येक गावात टोकाची ईर्ष्या पाहायला मिळणार आहे यात शंका नाही.
23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध
बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत.
चार तालुक्यांमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
दरम्यान, जिल्ह्यातील 12 पैकी 8 तालुक्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले असले, तरी 4 तालुक्यांमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. करवीर, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. करवीर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. विधानसभेतील गणित या गावांमधील गटाची सत्ता निश्चित करणार आहे. कोल्हापूर शहराला लागून असलेल्या तसेच हद्दवाढीत समावेश असलेल्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कळंब्यात सतेज पाटील यांना सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले असले, तरी सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे.
करवीरमधील (Karvir Tehsil Gram Panchayat) ग्रामपंचायतींवर सतेज पाटील, महाडिक आणि नरके गटामध्ये सर्वाधिक चुरस आहे. त्यामुळे विधानसभेची जुळणी करण्यासाठी नेत्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. करवीरमधील ग्रामपंचायती कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या दोन मतदारसंघातील आहेत. त्यामुळे सतेज पाटील गटासह पी. एन. पाटील आणि चंद्रदीप नरके यांच्यामध्ये थेट लढत आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक गटातटाचे राजकारण कागल तालुक्यात होते. मात्र, कागलमध्ये (Kagal Tehsil Gram Panchayat) एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे गटातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे या संघर्षाचे पडसाद नक्कीच तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये दिसून येणार आहे. सप्टेबर महिन्यात झालेल्या तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये मुश्रीफ गटाने सत्ता मिळवली होती. थेट सरपंच निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या शीतल नवाळे यांनी 398 मतांनी विजय मिळवला. ग्रामपंचायतीमध्ये मुश्रीफ-मंडलिक गटाचे 8 तर 3 जागांवर घाटगे गटाचे उमेदवार विजयी झाले होते.
हातकणंगले (Hatkanagale Tehsil Gram Panchayat) तालुक्यातही ग्रामंपचायत निवडणुकीसाठी मोठी चुरस आहे. हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 303 अर्ज दाखल झाले होते. तालुक्यात अनेक गावात दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत. बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या रुकडी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. तालुक्यात अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणुका होत असल्याने माने गटाची परीक्षा असेल.
दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील (Shirol Tehsil Gram Panchayat) 17 ग्रामपंचायतींसाठी 122 अर्ज दाखल झाले होते. शिरोळमध्ये राजापूरवाडीत भाजपने आपला पहिला सरपंच बिनविरोध करताना विजयाचा श्रीगणेशा केला होता. बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाची सुद्धा शिरोळ तालुक्यात परीक्षा असेल.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोणत्या गावांमध्ये बिनविरोध निवडणूक?
शाहुवाडी (Shahuwadi Tehsil Gram Panchayat)
- करुंगळे, उदगिरी, कोळगाव, भैरेवाडी, सांबू
गडहिंग्लज (Gadhinglaj Tehsil Gram Panchayat)
- कडलगे, बटकणंगले, कौलगे, कडाल
चंदगड (Chandgad Tehsil Gram Panchayat)
- लक्कीकटे, सातवणे, नागणवाडी
पन्हाळा (Panhala Tehsil Gram Panchayat)
- पिंपळे तर्फे सातवे, शाहपूर, मिठारवाडी, आसगाव, कोतोली पैकी माळवाडी, गोलीवडे, किसरुळ, मानवाड, कोलिक, करंजफेण
गगनबावडा (Gaganbawda Tehsil Gram Panchayat)
- अणदूर, मार्गेवाडी, कोदे
आजरा (Ajara Tehsil Gram Panchayat)
- लाटगाव, आवंडी, धनगरवाडा, पोळगाव, पारपोली, चाफवडे
भुदरगड (Bhudargad Tehsil Gram Panchayat)
- अंतुर्ली, करडवाडी, पाल, कोळवण- पाळेवाडी, अनफ खुर्द
राधानगरी (Radhanagari Tehsil Gram Panchayat)
- आपटाळ, पाटपन्हाळा, पडसाळी, करंजफेण, शेळेवाडी, सोळांकूर, मानबेट, ढेंगेवाडी
इतर महत्वाच्या बातम्या