Ajit Pawar on Rohit Pawar: काही जणांना वाटतं आपण लईच मोठं झालो आहोत, दुसऱ्यांच्या पक्षात नाक खूपासयची गरज नाही; पक्ष 'हायजॅक'वरून अजितदादांचा पुतण्या रोहित पवारांना खोचक टोला!
Ajit Pawar on Rohit Pawar: काही जणांना वाटतं, आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडेच आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आम्ही आमच्या पक्षाचा बघतो, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Ajit Pawar on Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काका अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचे म्हटले होते. आता या बोचऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हायजॅक आरोपावरून अजितदादांनी दुसऱ्यांच्या पक्षांमध्ये नाक खूपसण्याची गरज नाही असा टोला रोहित पवार यांना लगावला. आज (16 ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, काही जणांना वाटतं, आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडेच आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, आम्ही आमच्या पक्षाचा बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खूपसण्याची गरज नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.
सूरज चव्हाण यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पक्षाच्या युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांत सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र सूरज चव्हाण निवडीबाबत अजित पवारांनी मला माहिती नाही असं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
काय म्हणाले होते रोहित पवार?
मारकुट्या सूरज चव्हाणांची अवघ्या काही दिवसांमध्येच सरचिटणीस पदावर नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून करण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी खोचक टीका केली होती. रोहित पवार ट्विट करत म्हणाले होते की, लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती (सूरज चव्हाण यांची) केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!
सर्वच आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत
दरम्यान, अजित पवार महायुतीवर बोलताना म्हणाले की, महायुतीमधील सर्वच आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये काहीच गैर नाही. विरोधक देखील आपापल्या परीने पक्ष वाढवत आहेत. त्यामुळेच मी आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातील देखील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या























