Kolhapur News: बार्टी पीएच.डीसाठी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देते मग सारथी का देत नाही? कार्यवाही करा, अन्यथा कार्यालयास टाळे टोकण्याचा इशारा
सारथी संस्था सरकारने समाजातील विद्यार्थी हितासाठी सुरू केली असताना असा दुजाभाव, भेदभाव कशासाठी? मराठा समाजाला वेगळा न्याय कशासाठी? समानतेचा हक्क नाही का? अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे.
कोल्हापूर : सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकांपासून फेलोशिप देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. आठ दिवसात कार्यवाही करा, अन्यथा सारथीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी दिला. दसरा चौकात मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारथी संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकापासून फेलोशीप देण्यात यावी म्हणून 2019 पासून विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत. 18 एप्रिल 2023 रोजी मराठा आरक्षण उपसमिती बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी सारथी संशोधक विद्यार्थ्यांना नोदणी दिनांकापासून फेलोशीप देण्याची मागणी जाहीरपणे मान्य केली होती. मात्र, त्यांनतर या निर्णयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मराठा समाजाला वेगळा न्याय कशासाठी? समानतेचा हक्क नाही का?
नोदणी दिनांकापासून फेलोशीप मिळण्याचा निर्णय रद्द केल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एक ते दोन वर्षे संशोधन कार्यात अडचणी येत आहेत. बार्टी संस्था संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देते मग सारथी का देत नाही? सारथी संस्था सरकारने समाज विद्यार्थी हितासाठी सुरू केली असताना असा दुजाभाव भेदभाव कशासाठी? मराठा समाजाला वेगळा न्याय कशासाठी? समानतेचा हक्क नाही का? अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे.
अन्यथा सारथीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा
त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF 2023) बॅचला 600 वरून फक्त 50 जागा जाहीर करून अन्याय केला आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण नाही याचे भान ठेवून कोणत्याही आडकाठीशिवाय सरसकट फेलोशिप द्यावी, नोंदणी दिनांकांपासून फेलोशिप लागू करावी यासंदर्भात आठ दिवसात कार्यवाही करावी अन्यथा सारथीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे सारथीच्या माध्यमातून कौशल्य विकास कोर्सेससाठी योजना जाहीर झाल्या. शालेय स्तरावरील काही योजना प्रभावीपणे मांडून सरकार खऱ्या अर्थाने उच्च शिक्षण किंवा संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला ठेवण्यासाठी सारथीच्या माध्यमातून होणाऱ्या कल्याणकारी योजनेतील विद्यार्थी हिताचे निर्णय रद्द करीत आहे. सदर अन्यायकारक बदल तत्काळ रद्द करून मराठा विद्यार्थ्यांना पीएच. डीसाठी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी तसेच 2023 बॅचसाठी अर्ज केलेल्या आणि पात्र असलेल्या पीएच. डीच्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या