(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shoumika Mahadik on Gokul : संचालिका शौमिका महाडिकांच्या इशाऱ्यानंतर 'गोकुळ'मध्ये दोनच दिवसात चौकशीचे आदेश! नेमकी कोणती चौकशी होणार?
गोकुळ संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik on Gokul) यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘गोकुळ’च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिल्यानंतर चौकशीचे आदेश निघाले आहेत.
Shoumika Mahadik on Gokul : गोकुळ संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik on Gokul) यांनी दोन दिवसांपूर्वीच 'गोकुळ'च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिल्यानंतर चौकशीचे आदेश निघाले आहेत. शौमिका महाडिक यांनी चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गोकुळचे लेखापरीक्षण झाल्यानंतर लेखापरीक्षकांनी संघाचे खरे लेखे उघडकीस आणलेले नाहीत. त्यामुळे, गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी (Shoumika Mahadik on Gokul) कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार 10 दिवसांत गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांना दिल्या आहेत.
‘गोकुळ’मध्ये शौमिका महाडिक सातत्याने संघाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. सत्तांतरानंतर पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक यांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. दरम्यान, शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या काही व्यवहारांबाबत माहिती मागवली होती. गोकुळकडून आपल्याला कोणतीही योग्य माहिती दिली जात नाही. संचालक पदाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. संचालिका म्हणून महाडिक यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी गोकुळ प्रशासनाला दिले होते.
गोकुळकडूनही खुलासा मिळालेला नाही. याशिवाय, गोकुळने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात अनेक त्रुटी असल्याने चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती. महाडिक यांनी मागणीसोबत काही कागदपत्रेही जोडली आहेत.
शौमिका महाडिक यांनी काय म्हटले होते?
"गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्यानंतर मागील जवळपास चार महिने मी शांत होते. ना पत्रकार परिषद ना विरोधी वक्तव्य, पण या कालावधीत मी फक्त संघामध्ये चालू असलेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. याचं फळ लवकरच समोर येईल. मी पत्रकार बंधू-भगिनींच्या माध्यमातून माझी बाजू जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांसमोर पुराव्यानिशी नक्की मांडेन. शेवटी संयम महत्वाचा असतो..संयम ठेवा.. जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी महाडिक कुटुंब बांधिल आहे, आणि तो न्याय आम्ही नक्की मिळवून देऊ," असं शौमिका महाडिक म्हणाल्या होत्या.
गोकुळमधून महाडिकांची सत्ता खालसा
दरम्यान, 'गोकुळ'मधील माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता उलथवून टाकताना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. गोकुळमध्ये विरोधी बाकावरुन शौमिका महाडिक यांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या