Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत
खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला दिशेने जात होती. ही स्लीपर कोच बस गोव्यामधील पणजीमधून मार्गस्थ झाली होती. आज पहाटे दोनच्या कोल्हापूर शहरानजीक पुईखडीला भरधाव वेगात असताना पलटी झाली.
कोल्हापूर : कोल्हापुरात आज (23 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाला. गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बसचा कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला. यामध्ये नीलू गौतम (वय 43), रिद्धिमा गौतम (वय 17) आणि सार्थक गौतम (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये चौघेजण जखमी झाले. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये 25 प्रवाशी होते अशी माहिती आहे.
भरधाव वेगात बस उलटली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला दिशेने जात होती. ही स्लीपर कोच बस गोव्यामधील पणजीमधून मार्गस्थ झाली होती. आज पहाटे दोनच्या सुमारास हीच बस कोल्हापूर शहरानजीक पुईखडीला भरधाव वेगात असताना पलटी झाली. अपघात झाल्याचे समजल्यानंतर कोल्हापूर मनपाचे अग्निशमन दल आणि करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. यानंतर बचावकार्य राबवून जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले.
गारगोटी - आजरा रस्त्यावर मिनी बसचा अपघात
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील देवकांडगावमध्ये (ता. आजरा) गारगोटी-आजरा रोडवर मिनी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 3 प्रवासी गंभीर तर 15 किरकोळ जखमी झाले. बुधवारी हा अपघात घडला. धोकादायक वळणावर उताराचा अंदाज न आल्याने मिनी बस उलटली. सर्व प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. या मिनी बसमध्ये तीन कुटुंबातील सदस्य होते. कोल्हापुरात देवदर्शन करून गोव्याकडे निघाले होते. मिनी बस वेगात असल्याने देवकांडगाव घाटामध्ये चालकाला धोकादायक वळण व उताराचा अंदाज न आल्याने ब्रेक दाबल्यानंतर गाडी उलटून फरफटत गेली. यामध्ये तीन प्रवासी गंभीर, तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आजरा पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गडहिंग्लजला नेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या