(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange: सरपंचाच्या शेतात उदय सामंतांची भेट; भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? मनोज जरांगेंनी स्पष्ट सांगितलं
Manoj Jarange: मध्यरात्री अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) होण्याच्या तोंडावर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्द्यांवर उपोषणाचे हत्यार उपसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री घेतली आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. मध्यरात्री अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
या भेटीवर बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, एकच तारीख कार्यक्रम आहे, आपलं तुणतुण बंद होत नाही. तुम्ही माझ्याशी काहीही चर्चा करा. माझं येऊन टेकतं आरक्षणाच्या जवळ. जितका वेळ मी त्यांच्यासोबत बसलो होतो, तितका वेळ त्यांचं अंतकरण त्यांना बोलत असेल. माझं काळीज किती तिळ-तीळ जळ असेल. ते जर माणसाचं मन आणि जाण ठेवणारे असतील तर त्यांना समजेल. माझं मन तुटत होतं, माझ्या समाजाला वेठीस धरू नको, माझ्या समाजावर अन्याय करू नको. जे समाज कधीच आरक्षणात जाणार नाहीत, त्यांना तुम्ही आरक्षण दिलंत, माझा समाज जवळपास १४ महिन्यांपासून रस्त्यावर आहे. इतकी हीन वागणूक माझ्या गोरगरिब मराठ्यांना देऊ नका, शेवटी हाच जर गोरगरिब उठला तर,या आगीत होरपळून काढतील मराठे तुम्हाला सोडणार नाहीत असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यावेळी बोलताना म्हणालेत.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी त्यांचा पहिला दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे घेतला. या मेळाव्यात त्यांनी राज्यात उलथापालथ करण्याचे आवाहन केले. तसेच आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या रात्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी मनोज जरांगेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मनोज जरांगेंची भेट घेतली कारण, उदय सामंत म्हणाले...
मनोज जरांगे यांच्या भेटीवर बोलताना उदय सामंत म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी घनसावंगीला गेलो होतो. घनसावंगीवरून येताना मला सरपंचांनी सांगितलं की, मनोज जरांगेही या ठिकाणी मुक्कामी आहे. म्हणून मी जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलो आहे.