अब्दुल सत्तारांचं वक्तव्य म्हणजे सरकारमधील नेत्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण; राजू शेट्टी कडाडले
Raju Shetti on Abdul Sattar: अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्य म्हणजे, सरकारमधील नेत्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य सरकारमधील मंत्र्यांना किती माज आलाय, याचं ज्वलंत उदाहरण असून आकडेवारीनुसार सर्वाधिक आत्महत्या एकनाथ शिंदेच्याच सरकारमध्ये होत आहेत." तसेच, सवंग लोकप्रियेसाठी आणि अनावश्यक योजनांसाठी सरकारी तिजोरीतील पैसे उधळले जात असून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे. जालन्यातील परतूर येथे स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या 'या' वक्तव्यावरुन वाद
कृषीमंत्री अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबतही अब्दुल सत्तारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता शेतकऱ्यांबाबत बोलतानाही अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. सत्तारांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील असल्याची प्रतिक्रिया राज्यभरातून समोर येत आहे.
शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं होतं. त्याचसोबत, आपल्या मतदारसंघात पाहणी केली, मात्र शेतीचं फार नुकसान झालेलं नसल्याचंही सत्तार यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यांमुळे अब्दुल सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत. सत्तार यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात तीन आत्महत्या झाल्यात तर त्यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा आत्महत्या झाल्या आहेत.
दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलं आहे. संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत कृषिमंत्री असलेल्या सत्तार यांनी शेतकरी आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.