Pankaja Munde Jalna: जालन्यात अतिवृष्टीने पीकं आडवी, पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर, म्हणाल्या...
Pankaja Munde Jalna: मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी. सततच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यात कापुस,सोयाबीन, मुग खरीप पिकांचे नुकसान. पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर

Pankaja Munde Jalna: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी शिरल्याने कापणीला आलेली पिकं आडवी झाली आहेत. काल जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना, अंबड, बदनापुर, तालुक्यामधील पिकांचे (Crops) अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील म्हात्रेवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या पिकांचे कशाप्रकारे नुकसान झाले आहे, हे दाखवले. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. आज काही ठिकाणी मी पाहणी करणार आहे. यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेईन. सर्व अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती अवघड आहे. संपूर्ण पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली जाणार आहे. या सरकारच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून त्याचे पंचनामे करून मी हे मुख्यमंत्री महोदय वित्तमंत्री यांना नक्कीच सादर करेन. जेणेकरुन तात्काळ मदत करत येईल. सर्व मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Parbhani Rain: शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने अक्षरशः कहर केलाय सप्टेंबर मध्येच पावसाची सरासरी ओलांडली आहे. जून ते आज पर्यंत जिल्ह्यात 104% पाऊस झालाय यामुळे लाखो हेक्टर वरील हाताला आलेली सोयाबीन,कापूस मुग आदी खरीप पिके अगदी शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. परभणीच्या दैठणा येथील शेतकरी बन्सी कच्छवे यांनी दीड एकरमध्ये मुग लागवड केली होती. मुग चांगल्या प्रतीचा आलाही होता. मात्र, सतत पाऊस सुरू असल्याने या मुगाला बुरशी आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांला हा मुग काढणीचा खर्चही परवडेना म्हणून गावातील मजूर महिलांना दीड एकराचा प्लॉट देऊ टाकला. गावातील मजूर महिला हा मुग काढून घेऊन जातात हाताला काही लागते का ते पाहत आहेत.
Solapur Rain: बार्शी तालुक्यातील आगळगाव मंडळात अतिवृष्टीमुळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बार्शी तालुक्यातील आगळगाव मंडळामध्ये एका रात्रीत तब्बल 80 मिलिमीटर पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीला महापूर आला असून आगळगाव, उंबरगे, कळंबवाडी, काटेगाव, खडकोणी, चूंब, भानसळे, कोरेगाव , धामनगाव सह अनेक गावांचा बार्शी तालुक्याच्या संपर्क तूटला आहे. मुसळधार पावसाने ओढे-नाले आणि नद्यांना पूर आला असून, शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन, उडीद, मूग आणि कांदा, भुईमूग या पिकांमध्ये पाणी साचल्याने अनेक शेती पाण्याखाली गेली आहे. खरिपातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन चिखलात गाडले गेले असून कांद्याच्या शेतात पाणी साचल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून आगामी हंगामही धोक्यात आला आहे.नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आणखी वाचा
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, दोन महिलांचा मृत्यू, शेती पिकांनाही मोठा फटका























