(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांसह लवकरच आंदोलकांची भेट घेणार
Jalna Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
LIVE
Background
Jalna Protest : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. तर, आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. आज सकाळी आंदोलकाची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. तर, ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त राज्यभरात पसरल्यानंतर सगळ्याच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, छत्रपती संभाजी राजेंपर्यंत विरोधी पक्षातील सगळ्यांनीच या कारवाईचा निषेध केला आहे. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटं आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज नक्कीच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
Jalna Update : जालन्यात सोमवारपासून 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश
जालना : जालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत.
Jalna : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांसह लवकरच आंदोलकांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांसह लवकरच आंदोलकांची भेट घेणार- सूत्र
अजित पवार गटाची मराठा आरक्षण मिळावी हीच भूमिका असल्याची आमदारांची एबीपी माझाला माहिती.
अजित पवार आमदारांसह आजच आंदोलन स्थळी जाऊन भेट घेणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी आजची भेट टाळली- सूत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार आंदोलकांच्या संपर्कात असून लवकरच आंदोलन स्थळी जाऊन भेट देखील घेणार.
Indapur News : जालन्यातील घटनेचे पडसाद, इंदापूरमध्ये रास्तारोको आंदोलन
इंदापूर : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कृतीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी राज्यात उमटत असून इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन करत लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पुणे सोलापूर महामार्ग आंदोलकांनी अडवून धरत घटनेचा निषेध केला. आंदोलकांनी जवळपास 10 ते 15 पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकानी मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Pimpari News : जालना लाठीचार्जचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले, 'त्या' भागातील एसटी रद्द
पिंपरी-चिंचवड : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे. या आंदोलनाचा मोठा फटका हा राज्य परिवहन महामंडळाला बसत आहे पिंपरी-चिंचवड आगारातून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाऱ्या 100 पेक्षा अधिक बस रद्द झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तर महामंडळाचंही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
जालना लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्रालयाची कारवाई
जालन्यातील घटनेमध्ये अनेक पोलीस देखील जखमी झाले असून गृहमंत्रालयाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.