मराठा आरक्षणाबाबत पोस्ट शेअर करणे महागात पडले, जालन्यातील 27 शिक्षकांना नोटीसा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी एकूण 27 शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Teacher Notice In Jalna : राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा तापला आहे. दरम्यान, याच मुद्यावरून सोशल मीडियावर (Social Media) देखील याबाबतचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. मात्र, जालन्यात (Jalna) आरक्षणाबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे शिक्षकांना (Teacher) चांगलेच महागात पडले आहे. कारण मराठा आरक्षणाबाबत सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी एकूण 27 शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करणाऱ्या जालना जिल्ह्यातील शिक्षकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. जालना जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत 27 शिक्षकांना या नोटीस दिल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून शिक्षकांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी शिक्षकांना नोटिसा पाठवल्या असून, 7 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तीन शिक्षणाधिकारी आणि ओबीसी नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार आहे.
यांना मिळाल्या नोटीसा...
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील ईश्वर गाडेकर या शिक्षकाने आरक्षणाबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यावर इतर शिक्षकांनी मतप्रदर्शन केले होते. या पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप झाला आणि त्यानुसार 27 शिक्षकांना नोटीसा दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी विनोद आरसूळ, दिगंबर गाडेकर, सतीश अंभोरे, नागेश मगर, उध्दव पवार, बद्री यादव, गजानन वायाळ, मधुकर काकडे, रामेश्वर काळे, अशोक शिंदे, दिगंबर जाधव, रमेश मायंदे, ऋषीकेश मुके, विनायक भिसे, विजय गाढेकर, मनोहर साबळे, अप्पासाहेब मुळे, सतीश नागवे, भगवान देठे, दीपक चव्हाण, जगन्नाथ शिंदे, चक्रपाणी मुळे, सुभाष भडांगे, विठ्ठल घुले, लक्ष्मण नेव्हल, डी.बी.घुमरे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून...
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आरक्षणाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग केली जात आहे. विशेष म्हणजे सायबर क्राईमचे विशेष पथक देखील सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. तसेच, वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या लोकांना पोलिसांकडून नोटीस देखील देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या पोस्ट टाकू नयेत, तसेच त्याला लाईक, शेअर करू नयेत असे आवाहन देखील सतत पोलिसांकडून केले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: