मराठवाड्यात पुरावे सापडले तरी सर्वच मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल, अर्धवट आरक्षण घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Maratha Reservation : इतर जातींना जर अर्धवट आरक्षण दिलं असेल तर आम्हीही घेऊ, असा शहाणपणा आम्हाला शिकवू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
जालना: मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्या ही भूमिका पुराव्यासाठी होती, आता जर पुरावे सापडले तर राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल, असं अर्धवट आरक्षण घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका जाहीर केली.
असे अर्धवट आरक्षण घेणार नाही
मनोज जरांगे म्हणाले की, बाकीच्या जातींना दिलेले आरक्षण अर्धवट असेल तर मग आम्हीही घेऊ, असा शहाणपणा आम्हाला शिकवू नका. पुराव्याची भूमिका ही मराठवाड्यासाठी होती, त्यामुळे आता पुरावे सापडले तर सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल. मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी आपलं काम थांबवावं.
मी इथेच आहे मला कोणी जबरदस्ती नेलं नाही, या वेळेस मला सरकार नेणार नाही काळजी करू नका. मी सुरक्षित आहे. मला सरकार जबरदस्तीने घेऊन जाऊन शकत नाही आणि आम्ही देखील सज्ज आहोत असं मनोज जरांगे म्हणाले. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणीही वेगळं आंदोलन करू नका, सरकारचं ऐकून समाजाच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
मनोज जरांगे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही आजवर सामंजस्यची भूमिका घेतली. सामंजस्य म्हणजे काय ते एकदा येऊन समजून सांगा. मराठ्यांची फसवणूक करणे हे सामंजस्य आहे का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी इकडे यावं, त्यांना मराठे अडवणार नाहीत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं असून आता यापुढे अन्न, पाणीच काय तर उपचारही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
गावागावात साखळी उपोषण सुरू करा
ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करावं आणि इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या आंदोलनाच्या दरम्यान जर कुणाला काही झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला.
ही बातमी वाचा: