Manoj Jarange : सरकारची वेळ संपली, आता उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करणार; मनोज जरांगे आक्रमक
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.
जालना : मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली असून उद्यापासून सलाईन काढली जाणार आणि पाणीही बंद केलं जाईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मागील 10 दिवसांपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्यांनी आपण सरकारला चार दिवसांची वेळ देत असून, त्यानंतर पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र चार दिवसात आरक्षणाच्या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आपण उद्यापासून पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
आधीच जरांगे यांचा बिपी कमी झाला होता. तसेच त्यांच्या किडनीवर देखील परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या पाणी न घेणे आणि उपचारासाठी नकार देण्याच्या भुमिकेमुळे प्रकृतीवर परिणाम करू शकते. त्यामुळे जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारचं टेन्शन वाढणार आहे. तर, त्यांनी आपली भूमिका बदलण्याबाबत त्यांच्याकडे प्रशासनाकडून विनंती केली जाण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले जरांगे?
दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, माझ आमरण उपोषण सुरु आहे. सरकारच्या सांगण्यावरून आतापर्यंत उपचार आणि पाणी घेत होतो. पण त्यांना दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळपासून अन्न, पाणी आणि सरकारकडून सुरु असलेल्या उपचाराचे देखील त्याग करणार आहे. सोबतच आता पुढील चर्चेसाठी जायचं की, नाही याबाबतीत आम्ही महाराष्ट्र पातळीवर आमची एक बैठक घेणार आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
2004 च्या जीआरनुसार निर्णय घ्यावा...
आमची मागणी अशी आहे की, मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे. त्यानुसार जीआरमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी आहे. मात्र, तशी दुरुस्ती आज आणलेल्या जीआरमध्ये आम्हाला आढळून आली नाही. त्यांच्या जीआरमध्ये कुणबी आणि मराठा असं वेगळ करण्यात आले आहे. तुमच्याकडे जर कुणबी असल्याचे वंशावळ पुरावे असतील तरच कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचा त्यात उल्लेख आहे. पण आमची मागणी अशी आहे की, 2004 च्या जीआरनुसार मराठा समाजाला तातडीने मराठा कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. याबाबत स्पष्ट अशी ओळ आम्ही लिहून दिली होती. पण जे बोलणं झालं होतं ते जीआरमध्ये नाही. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचे जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं, पण जरांगे म्हणाले...