Jalna News: अखेर खोतकर शिंदे गटात सहभागी; उद्धव ठाकरेंची साथ सोडतांना डोळ्यात अश्रू
Aurangabad News: खोतकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
Jalna News: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील अनेकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसैनिकांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अर्जुन खोतकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती देतांना खोतकर यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
शिवसेना सोडतांना खोतकर म्हणाले की, मी शिंदे गटात सहभागी होत आहे. सोबतच माझ्या उपनेते पदाचा राजीनामा सुद्धा देणार आहे. माझ्या काय अडचणी होत्या त्या उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहे. स्वतःला सेफ ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असेही खोतकर म्हणाले.
दिल्लीत ठरलं आणि जालन्यात घडलं...
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अजून निर्णय झाला नसल्याचे खोतकर म्हणाले होते. परंतु आज जालन्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली आहे.
यापूर्वीही बंडात सहभाग पण...
अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या निर्णय घेतला असला तरीही त्यांच्या बंडाची ही पहिली वेळ नाही. कारण यापूर्वी शिवसनेत झालेल्या अनेक बंडात अर्जुन खोतकरांचा सहभाग होता, पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलल्याचा अनेक घटना आहे. नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेल्या बंडात खोतकर सुद्धा त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा झाली होती. पण ऐनवेळी खोतकरांनी निर्णय बदलला होता. मात्र यावेळी अखेर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा अंतिम निर्णय घेतला.
खोतकरांना 'ईडी'ची भीती?
खोतकरांच्या जालन्यातील रामनगर येथील कारखान्यावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच ईडीने कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात अनियमित्ता झाली असल्याचा ठपका ठेवला होता. सोबतच कारखान्याची यंत्र, जमीन यासह इतर बाबी जप्त केल्या होत्या. यामुळे खोतकर अडचणीत सापडले होते. तर ईडी'च्या भीतीनेच खोतकर शिंदे गटात सहभागी झाले असल्याची चर्चा जालन्यात पाहायला मिळत आहे.