Jalna: अतिक्रमणाविरोधात शिवरुद्र योगी महाराजांचा अनोखं आंदोलन, खोल खड्ड्यात बसले, संजीवन समाधीचा इशारा
जालना : अतिक्रमणा विरोधात जालन्याच्या शिव रुद्र योगी महाराजांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन चालू केले आहे .

Jalna: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खादगाव येथे अतिक्रमणाविरोधात शिवरुद्र योगी महाराजांनी एक अनोख्या पद्धतीने आंदोलन चालू केले आहे. शिवशक्ती कैलास आश्रमाचे प्रमुख शिवरुद्र योगी महाराज यांनी त्यांच्या आश्रम परिसरात झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात थेट जमिनीत खोल खड्डा खोदून त्यात बसून उपोषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी संजीवन समाधी घेण्याचाही इशारा प्रशासनाला दिलाय .
अतिक्रमणाचा आरोप, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा ठपका
खादगाव येथील शिवशक्ती कैलास आश्रम परिसरात महाकालेश्वर मंदिराची उभारणी सुरू आहे. मात्र या मंदिराजवळील शासकीय जमिनीवर गावातील काही नागरिकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप महाराजांनी केला आहे. अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्यामुळे अखेर शिवरुद्र योगी महाराजांना थेट आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्याचं ते म्हणाले.
शिवरुद्र योगी महाराज काय म्हणाले?
आश्रमासमोरील शासकीय जमिनीत बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवावे .अतिक्रमण करणाऱ्या सगळ्यांना ताब्यात घ्यावे अशी मागणी करत प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर संजीवन समाधी घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.आता आम्ही खड्ड्यात बसून उपोषण करत आहोत.
प्रशासनाने यापूर्वीही दिले होते आश्वासन
या गायरान जागेवर शिवरुद्र कैलास आश्रमाच्या शेजारील तिरुपती मंदिराजवळ शासकीय शाळासमोर रास्ता करून देण्यात आला असून, सदर जमीन गट नंबर ५७ मधील ४ ते ५ एकर असून, याठिकाणी अतिक्रमण झाले आहे. चार वेळा निवेदन दिले असून, यावेळी अंतिम वेळ देत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी योगेश योगी, महाकालेश्वर मंदिराचे पुजारी, समाधान महाराज, नागनाथ महाराज, शिष्यगण व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, गावातील अनेकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. सुमारे ३ तास खड्यात बसून हे उपोषण करण्यात आले. तहसीलदार यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष
भोकरदन तालुक्यातील खादगाव येथील सरकारी गायरान गट क्र.५७ मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने आश्रमाचे शिष्यगण व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मंदिर परिसरात घाण व कचरा फेकला जात असल्याने परिसराचे पावित्र्य बिघडत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे.























