Maratha Reservation : जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक, कार्यकर्त्यांकडून आपली घरं जाळून घेतायत ही शंका; जाळपोळ न करण्याचं जरांगेंचं आवाहन
Maratha Reservation Protest : जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
जालना : मी समाजाला सांगितले होते, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण (Maratha Reservation) करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय ही शंका येतेय. जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीत घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
बीडसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.
जाळपोळ करू नका अन्यथा निर्णय घेणार
मराठा समाजाने शांत रहावं असं आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले की, सर्वाना माझी हात जोडून विनंती, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचं आहे. आपण कुणाच्याही दारात जाचचं नाही.
जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक
जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक असल्याचा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की, काही सत्ताधारी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपलीच घरं जाळण्याचा प्रयत्न करतात अशी शंका आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही धिंगाणा घातला तरी आपण उपोषण थांबवणार नाही.
प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान ठेऊन पाणी पिणार
जर मराठा समाजाला वाटत असेल तर माझी तब्येत खराब होतेय म्हणून जर उद्रेक होत असेल तर मी आता ग्लासभर पाणी पिणार. प्रकाश आंबेडकर यांनी पाणी प्यायला सांगितले, त्यांचादेखील सन्मान राखून पाणी आज पाणी पिणार. बच्चू कडू देखील आपल्यासाठी आंदोलन करत आहेत.
दरम्यान, बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय, मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ही बातमी वाचा: