(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation: सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल, आज तोडगा निघणार का?
Jalna Maratha Protest : जालन्यात राज्य सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं असून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहे.
जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दाखल झालं आहे. सोमवारी मुंबईत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह काही मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सरकारचं मंत्रिमंडळ अंतरवाली सराटी गावात दाखल झालं असून, उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेत आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना सरकारकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आज सरकारचं एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. यासाठी मुंबईहून निघालेलं हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात पोहचले आहे. या शिष्टमंडळात रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे.
बैठकीकडे सर्वाचं लक्ष
जालना येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून केलेल्या लाठीमारानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आरक्षणावरून राज्यभरात मराठा समाजातील संताप पाहता, सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारचे काही मंत्री आज अंतरवाली सराटी गावात पोहोचले आहेत. यावेळी हे शिष्टमंडळ उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे. तसेच या बैठकीतून काही तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
आधी जीआर घेऊन या
अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांनी भेट घेतली आहे. मात्र आरक्षणाचा जीआर घेऊन त्यानंतरचं उपोषण मागे घेणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले होते. त्यामुळे आज काही तोडगा निघतो का? की मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडी सबुरी ठेवावी लागणार
जालना येथील अंतरवाळी सराटी गावात सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ गावात पोहचलं आहे. दरम्यान जालन्याकडे निघण्यापूर्वी औरंगाबाद विमानतळावर या शिष्टमंडळाने माध्यमांशी संवाद साधला. आम्ही उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. मात्र या सर्व गोष्टींसाठी थोडी सबुरी ठेवावा लागेल असं गिरीश महाजन म्हणाले आहे.