जळगावमध्ये उन्हाचा कहर; मुक्या जीवांना त्रास, 100 मेंढ्या दगावल्या; आमदाराने घेतली धाव
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ व खान्देशात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे
जळगाव : यंदाच्या हंगामातील मान्सनपूर्व उन्हाळ्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून देशातील सर्वाधिक तापमानाची (Temperature) नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये 49 अंश सेल्सियपर्यंत तापमान पोहोचलं आहे. तर, महाराष्ट्रातील विदर्भ आणि खान्देशात उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. जळगावमध्ये (jalgaon) काल उन्हाच्या तडाख्यात वाहतूक करणाऱ्या ट्रकलाच एका भीषण आग लागल्याचे दिसून आले होते. आता, उन्हाच्या कडक प्रहारामुळे मुक्या पशुधनास जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून 47 अंशांवर तापमान पोहोचले आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ व खान्देशात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांना, शेतातील पिकांनाच बसतो असे नाही. तर, मुक्या जीवांना देखील कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या खळबळजनक घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा असून उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
आमदार पाटील यांनी दिली भेट
जळगावीमधील मेंढ्या दगावल्याच्या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. तसेच, स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्मा घातामुळेच मेंढ्या मरण पावल्याचे निदान त्यांच्या अहवालातून समोर आले आहे.
उन्हामुळे ट्रकनेच घेतला पेट
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या या ट्रकला आग लागल्यामुळे येथील उन्हाची तीव्रता लक्षात येईल. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमनचे बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं बोलंलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही जाणकारांकडून देण्यात येत आहे.
हेही वाचा
हाय रे ऊन्हाळा... उष्णतेच्या लाटेत चक्क गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला, जाळ पाहून धावले गावकरी