(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ खडसेंना धक्का, जळगाव दूध संघ अपहारप्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक
जळगाव दूध संघ घोटाळा प्रकरणी संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना पोलिसांनी अटक केली आहे. लिमये यांच्या अटकेमुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
जळगाव : जळगाव दूध संघ ( Jalgaon Milk Scam) घोटाळाप्रकरणी संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये (Manoj Limaye) यांना पोलिसांनी अटक केली आहे. लिमये यांच्या अटकेमुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक संचालक मंडळ हे दूध संघात कार्यरत होते. यावेळी कार्यकारी संचालक मनोज लिमये होते तर अध्यक्ष पदी मंदाताई खडसे या होत्या. मुदत संपली असताना देखील संचालक मंडळ पदावर असल्याने भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हरकत घेतल्याने शासनाने हे संचालक मंडळ बरखास्त करून शिंदे सरकारने प्रशासक मंडळ या संघावर बसवले होते. यामध्ये प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांचा देखील समावेश आहे. प्रशासक मंडळाने दूध भुकटीमध्ये आणि तुपामध्ये एक कोटीहून अधिक रुपयांच्या अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. हा अपहार नसून चोरी असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती
अगोदरच प्रशासक मंडळ हे बेकायदेशीर असल्याचं सांगत खडसे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी न्याल्यालयाने संचालक मंडळाच्या बाजूने निकाल देत प्रशासक मंडळ बरखास्त केले होते. मात्र तरीही प्रशासक मंडळाने दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करत सोमवारी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक केली आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.लिमये यांच्यानंतर पुढे कोणाचा नंबर लागतो या विषयी आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दूध संघाची निवडणूक होणार आहे. दूध संघाच्या 20 संचालकांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली आहे.दूध संघात चोरी, अपहार प्रकरणावरून दूध संघातील राजकारण आधीच तापलं आहे. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळं पुन्हा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :