दोन्ही बाजूंनी नदीचा प्रवाह, चार तास मृत्यूच्या विळख्यात; जळगावच्या सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांची सुटका
Jalgaon Rain Updates : जळगाव, रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आलं आहे.
Jalgaon Rain Updates : जळगावच्या (Jalgaon) रावेर तालुक्यातल्या गारबर्डी धरणात 9 जण अडकले होते. सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. तर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात तसेच धरण परिसरात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणात सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता 9 पर्यटक अडकल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे होते. त्यांच्या दोन्ही बाजूने पाण्याचा प्रचंड वेढा होता. जसजसा वेळ जात होता, तसतसा पाण्याचा प्रवाह वाढत होता. पाण्याचा प्रवाह वाढतच असल्यानं हे सर्वजण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भातील माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दिली. तसेच, या 9 पर्टकांची सुटका करुन घेण्यासाठी बचाव कार्य तातडीनं सुरु करण्याची विनंतीही केली.
या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी आणि रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस आणि नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली.
प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी स्थानिक नागरिक तसेच पोहोणाऱ्यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरु केलं. तब्बल चार तासांचे अथक प्रयत्न आणि स्थानिकांच्या मदतीनं मुक्ताईनगर येथील 9 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात तसेच धरण परिसरात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तरीही अनेक नागरिक दुर्लक्ष करुन वारंवार नदीप्रवाहात पोहोण्यासाठी उतरतानाच्या घटना घडतात. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे.
सुकी नदी पात्रातून सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं :
- अतुल प्रकाश कोळी (20)
- विष्णू दिलीप कोलते (17)
- आकाश रमेश धांडे (25)
- जितेंद्र शत्रुघ्न कूंडक (30)
- मुकेश श्रीराम धांडे (19)
- मनोज रमेश सोनावणे (28)
- लखन प्रकाश सोनावणे (25)
- पियूष मिलिंद भालेराव (22)
- गणेशसिंग पोपट मोरे (28)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gadchiroli Rain Updates : गडचिरोलीत पूरस्थिती कायम; आतापर्यंत कोणत्या तालुक्यात, किती नुकसान?