(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Political News : टीका करताना आमदार मंगेश चव्हाण यांची जीभ घसरली, एकनाथ खडसे यांचा बाप काढला!
Jalgaon Political News : जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपात टीकेची पातळी घसरू लागली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांची एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.
Jalgaon Political News : भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा टोकाला गेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर देताना भंगार विक्री करणारा तो असा एकेरी उल्लेख करत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर विखारी हल्ला केला. एकनाथ खडसे यांचा बाप तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला होता का? अशा शब्दात आमदार चव्हाण यांनी टीका केली.
जळगाव जिल्ह्यात सध्या एकनाथ खडसे विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट असे चित्र दिसत आहे. त्यातून खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज खडसे यांच्यावर टीका करताना आमदार चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. इमान विकून तसेच पक्षाशी गद्दारी करत एकनाथ खडसेंनी पैसे कमविले. खडसे हे तोडपाणी करणारे नेते असल्याचे एकनाथ खडसे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने म्हटले होते, असे चव्हाण यांनी सांगितले.
आमदार चव्हाण पुढे म्हटले की, अपहाराच्या खटल्यामध्येच एकनाथ खडसे यांच्या जावयाला दोन वर्षे जामीन मिळाला नाही. खडसे पुराण आता चालवण्यासारखं राहिलेलं नाही. बुढीया सटीया गया है. एकनाथ खडसे यांचा डोकं सटकला आहे अशा शब्दात आमदार मंगेश चव्हाण यांनी विखारी टीका केली.
कागदाचे उत्तर कागदाच्या भाषेत मिळतील. शब्दाचे उत्तर शब्दाच्या भाषेत मिळतील. त्यांना ज्या ज्या भाषेत समजत त्या त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. एकनाथ खडसेंना मी अनेकदा आव्हाने दिली. मात्र त्या आव्हान का स्वीकारत नाही, याचा अर्थ काय असा सवालही आमदार मंगेश चव्हाण यांनी केला.
मी कधी भंगार विकायचा व्यवसाय केला हा शोध त्यांनी कुठून लावला माहित नाही. माझा दुचाकी विक्रीचा व्यवसाय होता. त्याबाबत मी अनेकदा सांगितलं आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार झालो. एकनाथ खडसे यांची मला कधीही मदत घेण्याची गरज पडली नाही असं सुद्धा यावेळी चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शेतकरी असताना सात सात वेळा विधानसभा निवडणूक कशी लढवली, खासदारकीच्या निवडणुका लढवल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या, हे एखाद्या शेतकरी माणसाला कस शक्य होईल.. एकनाथ खडसेंनी एवढे पैसे कुठून आणले, असा सवाल ही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.