Sankashti Chaturthi 2023 : 31 फूट उंच, 100 टन वजन; जळगावचा सिद्धी महागणपती; देशातील सर्वात उंच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Sankashti Chaturthi 2023 : जळगाव जिल्ह्यात पाळधी गावाबाहेर श्री सिद्धी महागणपती भव्य असं देवस्थान उभारण्यात येत आहे. याठिकाणी तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Sankashti Chaturthi 2023 : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिद्धी महागणपती (Shree Siddhi Mahaganpati) भव्य असं देवस्थान उभारण्यात येत आहे. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने हे भव्य असं मंदिर साकारण्यात येत आहे. संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023) निमित्ताने या ठिकाणी देशात कुठेही नाही, एवढी तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची (Ganesh Idol) आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणेश मूर्तीचे वैशिष्ट्ये
374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. 100 टन एवढे या मूर्तीचे वजन आहे. तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत. आजूबाजूला रिद्धी-सिद्धी असलेले आणि तर श्री गणरायाच्या सोंडेत अमृत कुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायांचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात. तब्बल 200 किलो वजनाची घंटा सुद्धा याठिकाणी असून ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईतून क्रेन मागवण्यात आली. आधी मूर्ती ठेवण्यात आली, त्यानंतर आता मंदिर साकारण्यात येत आहे.
मूर्तीखाली 21 कोटी मंत्र लिहिलेली पुस्तके
जिल्ह्यातील चार ते पाच हजार भाविकांनी लिहिलेली ओम गण गणपतेय नम: अशी मंत्र असलेली तब्बल 21 कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तके या मूर्तीखाली ठेवण्यात आली आहे. एका पुस्तकात 54 हजार मंत्र लिहिण्यात आली आहेत. अशा पद्धतीने 21 कोटी मंत्र लिहायला अडीच वर्ष लागली. मूर्तीच्या खाली 21 ते 22 फूट खोल पाच थरामध्ये पॅकिंग करुन ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर त्यावर मूर्ती ठेवून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
विविध राज्यातील विद्वानांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने या सिद्धी महागणपतीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राजस्थान, काशी अशा वेगवेगळ्या राज्यांमधील 18 विद्वानांना बोलावण्यात आलं. त्यांच्या हस्ते नान्दीश्राद्ध, गणपती मातृका पूजन, दशविध स्नान हवन, नित्य आराधना, जलयात्रा, दुग्धअभिषेक करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
आज संकष्टी चतुर्थी!
हिंदू पंचांगानुसार, आज माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास गणपतीला (Lord Ganesh) समर्पित केला जातो. या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. आजची संकष्टी चतुर्थी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:10 वाजता सुरु होईल आणि 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.58 वाजता समाप्त होईल.संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर फळे खावीत आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा. आज चंद्रोदयाची वेळ रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी आहे.
VIDEO : Jalgaon Siddhi Mahaganapati : जळगावात देशातील सर्वात उंच सिद्धी महागणपतीची प्राणप्रतिष्ठा