Gulabrao Patil : आधी 50 खोके एकदम ओके म्हणून टीका आता बोलती बंद, गुलाबराव पाटील यांचा देवकरांसह राष्ट्रवादीवर हल्लाबोल
Gulabrao Patil : "आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणत टीका करत होते. आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली," अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता गुलाबराव देवकर यांच्यासह समर्थकांवर निशाणा साधला.
जळगाव : "आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणत टीका करत होते. आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली. आता यांचे तोंड उघडत नाही," अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर निशाणा साधला. ते जळगावमध्ये (Jalgaon) बोलत होते.
'वर भाजप, कंबर शिवसेनेची आणि हात पाय राष्ट्रवादीचे'
राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. ट्रिपल इंजिन सरकार कसं आहे, यावर गुलाबराव पाटील यांनी अचूक शब्दात वर्णन केलं आहे. "तुम्ही मंत्री असताना तरी एकच सरकार होते, मात्र आमचं तीन जणांचे सरकार आहे. वर भाजप, कंबर शिवसेनेची आणि हात पाय राष्ट्रवादीचे असं चाललं आहे आमचं," असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाषणातून आपल्या अनोख्या शैलीत तुफान फटकेबाजी केली.
'आदेश शरद पवारांचे की अजित पवारांचे हे सिद्ध करा'
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनिल भाईदास पाटील यांचा या संबंधितांनी सत्कार केला आणि हे स्वतःला शरद पवार गटात असल्याचा दाखवतात. हे कसले शरद पवार गटात, आदेश शरद पवारांचे की अजित पवारांचे हे सिद्ध करा असं आव्हान सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
अनिल दादांचा सत्कार करणारे पण तुम्हीच, शरद पवार जिंदाबाद म्हणणारे पण तुम्हीच आणि विरोध करणारे पण तुम्हीच. हे लोक स्टेबेल नाहीत, मात्र आम्हीच स्टेबल आहोत. वर्षभर आमच्यावर गद्दार गद्दार म्हणून टीका झाली. मात्र आम्ही ते ऐकलं. आम्ही काम करत आहोत, असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
तुम्ही मत दिलं तर मी निवडून येईन नाहीतर माझ्यात निवडून येण्याची ताकद नाही, ही जनताच मायबाप आहे. जळगाव तालुक्यातील जनतेने साथ दिली नसती तर मी आमदार झालो नसतो. जनता सकाळी काँग्रेसचे जेवण करते, दुपारी भाजपचं तर रात्री शिवसेनेचं. हे लोक तर हुशार आहे, लोक खूप कलाकार आहेत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला.
हेही वाचा