Jalgaon : लाचार आणि हफ्तेखोर पोलिसांच्या कारभारामुळे मुक्ताईनगरात नगरसेविकेच्या पुत्राला मारहाण; एकनाथ खडसे यांचा आरोप
Eknath Khadse: एका मुलीच्या फोटोवर चुकीचे संदर्भ टाकल्यानंतर त्या मुलीसह तिच्या आईने नगरसेविकेच्या पुत्राला मारहाण केल्याची घटना आज घडली.
जळगाव: नगरसेविकेच्या पुत्राला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. नगराध्यक्षपदाची निवडणूक रद्द झाल्याच्या संतापातून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. तसेच लाचार आणि हप्तेखोर पोलिसांमुळेच मुक्ताईनगर शहरात अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुलीच्या फोटोवर चुकीचे संदर्भ टाकल्यानंतर मुलीसह तिच्या आईने नगरसेविकेच्या पुत्राला मारहाण केल्याची घटना आज घडली. हा नगरसेविकापुत्र खडसे समर्थक असून यावरून एकनाथ खडसेंनी पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. मुक्ताईनगर पोलिसांमुळे गुंडागर्दी वाढली असून लाचार आणि हप्तेखोर पोलिसांमुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहे, या गुंडांचे अवैध धंदे असल्याने आणि ते पोलिसांना हप्ते देत असल्याने या गुंडावर पोलीस कारवाई करत नसल्याचेही खडसे यांनी सांगितलं.
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, आज मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्याच्याच रागातून आज माझ्या कार्यकर्त्याला महिलेसह जमावाने मारहाण केला.
मुक्ताईनगरात संबंधित गुंडांकडून नेहमी अशाच प्रकारच्या घटना घडत असून या गुंडांवर कठोर कार्यवाही यासाठी लवकरच औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, मुक्ताईनगर येथील नगरसेविका पुत्रास मारहाण केल्या प्रकरणी पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे
काय आहे प्रकरण?
एका तरुणीसह तिच्या कुटुंबियांचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देवून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर येथे घडला होता. यावरुन तरुणीसह तिच्या आईने तो व्हायरल करणाऱ्या नगरसेविकेच्या मुलाला भररस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. संतापात तरुणीसह तिच्या आईने संबंधित तरुणाला कपडे फाटेपर्यंत मारले. अनिम खान असे या नगरसेविकेच्या मुलाचे नाव असून तो एकनाथ खडसे समर्थक असल्याची माहिती महिलेने पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. यावरुन मुक्ताईनगरातील वातावरण चांगलेच तापले आहे.